Shah Rukh Khan reaction on Aryan Khans new show: गेल्या काही काळात अनेक नवीन कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच आहान पांडेने सैयारा चित्रपटातून पदार्पण करत मोठी लोकप्रियता मिळवली. त्याआधी इब्राहिम अली खान, खुशी कपूर अशा काही कलाकारांनी पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी काहींचे कौतुक केले, तर काहींचा अभिनय पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

शाहरुख खान काय म्हणाला?

अशातच शाहरुख खानच्या मुलाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. अभिनेत्याचा मोठा मुलगा आर्यन खान द बॅड्स ऑफ बॉलीवूडमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा लाँच सोहळा पार पडला. यावेळी शाहरुख त्याच्या पत्नीसह हजर होता. यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधला. शाहरुख खान म्हणाला, “मी मुंबई, महाराष्ट्र तसेच या देशाच्या पावन धरतीचा आभारी आहे, जिने मला जवळजवळ ३० वर्षे तुम्हा सर्वांचे मनोरंजन करू शकेन अशी संधी दिली.”

“आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण माझा मुलगा याच धरतीवर पदार्पण करत आहे. खूप चांगला मुलगा आहे, असं सगळ्याच वडिलांना त्यांच्या मुलांविषयी वाटतं. खूप मेहनती आहे. आम्ही त्याला एक दोन गोष्टी या सांगितल्या आहेत की बॉक्स ऑफिसवरील जे यश असते, त्याची गॅरेंटी नसते. समीक्षकांच्या सकारात्मक रिव्ह्युजचीदेखील गॅरेंटी नसते. पण, मेहनतीत १०० टक्के गॅरेंटी असते. आज माझा मुलगा जेव्हा तुमच्यासमोर येईल, तुम्हाला जर त्याचं काम आवडलं, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. जे प्रेम तुम्ही मला इतक्या वर्षांत दिलं आहे, त्याचे १०, २०, ३० किंवा १५० टक्के प्रेम असेल तर ते त्याला द्या.”

तसेच जेव्हा आर्यनने पहिल्यांदा तो शो करणार होता त्याबद्दल सांगितले, त्यावेळी त्याची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलही खुलासा केला. शाहरुख खान म्हणाला, “जेव्हा मला आर्यनने सांगितले की मी एक बॉलीवूडवर आधारित एक शो करणार आहे, त्यामध्ये खूप गोष्टी असतील. ज्या आहे तशा दाखवल्या जातील, थोडा वेडेपणा असेल; तर मला वाटले की हा मन्नतचे सीसीटीव्ही फुटेज तर यूट्यूबवर अपलोड करत नाही ना? पण, तो एक अनोखा असा शो घेऊन येत आहे, मी त्याचा शो पाहून आनंदी आहे.”

आर्यन खान दिग्दर्शित द बॅड्स ऑफ बॉलीवूड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. १८ सप्टेंबरला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आर्यनच्या या शोसाठी अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच द किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.