किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची दोन गाणी प्रदर्शित झाली, आणि दोन्ही गाणी विविध करणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली. एका गाण्यातील दीपिका पदूकोणने घातलेल्या बिकीनीवरून तर हा वाद चांगलाच मोठा झाला आणि विविध स्तरातून या चित्रपटाला विरोध व्हायला सुरुवात झाली. हा वाद एवढा वाढला की ‘बॉयकॉट पठाण’ अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. असं असलं तरी शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खानने आजवर बरेच चित्रपट केले आहेत, पण त्यात अॅक्शनपट हे फारच कमी केले आहेत. किंबहुना असा पूर्णपणे कामर्शियल अॅक्शनपट शाहरुखने केलेलाच नाही. आता तब्बल ४ वर्षांनी शाहरुख अॅक्शन चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे यासाठी खुद्द शाहरुखसुद्धा उत्सुक आहे. यासाठी शाहरुखने शारीरिक मेहनत बरीच घेतल्याचं दिसून येत आहे. त्याचं पिळदार शरीर पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आणखी वाचा : “पठाणचा ट्रेलर पाहून मी…” ४ वर्षांनी ॲक्शनपटातून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा खुलासा

नुकतंच शाहरुखने ट्विटरवर #AskSRK या ट्रेंडमधून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्याला भरपूर चाहत्यांनी प्रश्न विचारले त्यापैकी काही ठराविक लोकांना शाहरुखने उत्तरं दिली. चाहत्यांनी त्याला ‘पठाण’च्या ट्रेलरबद्दल विचारलं, शिवाय ख्रिसमसबद्दलही विचारलं, यावर शाहरुखने मस्त मजेशीर उत्तरं दिली. अशाच एका चाहत्याने शाहरुखचा ‘पठाण’मधील लूक शेअर करत प्रश्न विचारला की, “अशी बॉडी बनवायला किती वेळ लागला?”

या प्रश्नावर शाहरुखने सवयीप्रमाणे त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, “५७ वर्षं लागली भावा”. यावरून शाहरुख गेली कित्येक वर्षं त्याच्या शरीरावर मेहनत घेतोय याचा अंदाज आला, शिवाय या उत्तरातून बॉडी ही अशी बनवली जात नसते तर शरीर कामवावं लागतं असंही या उत्तरातून शाहरुखने सांगायचा प्रयत्न केल्याचं लक्षात येत आहे. शाहरुखचे चाहते आता पठाणच्या ट्रेलरची वाट बघत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.