Who Is Shahrukh Khan’s lookalike Ibrahim Kadri : एका रात्रीत किंवा एका क्षणात आयुष्य बदलतं या वाक्याला साजेशा अशा गोष्टी आपण आजवर फक्त चित्रपटांमध्येच पाहिल्या असतील. पण, बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारासारखं दिसत असल्यानं एका तरुणाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. हा तरुण म्हणजे बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसारखा हुबेहूब दिसणारा इब्राहिम कादरी.

हो. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानसारखा दिसत असल्यानं इब्राहिम कादरी नावाच्या तरुणाचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं आणि एकेकाळी दोन वेळच्या जेवणाचे हाल असणारा इब्राहिम लाखो रुपये कमावू लागला. पण नेमकं काय घडलं आणि हा इब्राहिम प्रसिद्धीझोतात कसा आला ते जाणून घेऊया…

हुबेहूब शाहरुख खानसारखा दिसणारा इब्राहिम कादरी कोण आहे?

इब्राहिम मूळचा गुजरात येथील जुनागडचा राहणारा. तो रस्त्यावरील होर्डिंग रंगवण्याचं काम करायचा. परंतु, डिजिटल होर्डिंग आल्यानंतर मात्र इब्राहिमच्या समस्या वाढल्या. त्याच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आधीच दोन वेळच्या जेवणाचे हाल होत असताना आता इब्राहिमच्या हातचं कामही गेलं होतं. परंतु, असं म्हणतात ना जेव्हा सगळं संपतं तेव्हा नवीन सुरुवात होते. असंच काहीसं झालेलं. इब्राहिम कादरीच्या बाबतीत. काही दिवसांपूर्वीच इब्राहिम चक्क ‘वोग इंडिया’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकला.

इब्राहिमच्या घरातील लोक अनेकदा त्याला तो शाहरुख खानसारखा दिसतो असं म्हणायचे पण त्याचा यावर फार विश्वास नव्हता. मात्र एकदा आयपीएल मॅचदरम्यान जेव्हा लोकांनी त्याला पाहिलं आणि त्यालाच शाहरुख खान समजून त्याच्या भोवती गर्दी केली. तेव्हा सगळंच बदललं. स्वत: इब्राहिमने याबद्दल ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी पूर्वी आर्थिक अडचणींचा सामना करत होतो. दोन वेळेच्या जेवणाचेही हाल होते. त्यावेळी मला डिजीटल बोर्डमुळे खूप त्रास झाला. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. “

इब्राहिम पुढे म्हणाला, “जेव्हा मी शाहरुख खान सारखा हुबेहूब दिसत असल्यामुळे त्यांचा डुप्लिकेट म्हणून कार्यक्रम करायला सुरुवात केली तेव्हा मला कशाचीही माहिती नव्हती. मी त्यांच्यासारखं बोलण्याची किंवा डान्स करण्याची तालीम केली नव्हती. अनेकदा मला माझ्या या कामाचे पैसे मिळाले नाही. एकदा एका व्यक्तीने मला फक्त शाहरुख खानसारखं दिसणं पुरेसं नसतं असं म्हणत टोमणा मारलेला. त्यामुळे मी खूप दुखावलो गेलो होतो. मग मी माझ्यात बदल केले. मी शाहरुख खानसारखं वागायला शिकलो आणि आता मी दीड ते पाच लाख कमावतो. मला असं वाटतं की मी, सर्वाधिक पैसे कमावणारा डुप्लिकेट आहे.”

शाहरुख खानबद्दल इब्राहिम पुढे म्हणाला, मला कधीच शाहरुख खानला भेटायचं नाहीये आणि मी कॉमेडी शोचं निमंत्रण कधीच स्वीकारत नाही कारण तिथे शाहरुख खानची चेष्ठा केली जाते. जे मला आवडत नाही.”