Shah Rukh Khan Movies To Rerelease : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयशैलीने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याने आजवर विविध चित्रपटांत काम केलं आहे. अशातच आता एसआरकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचे काही गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहेत.

शाहरुख खानचे गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहेत. अभिनेत्याच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त हा फिल्म फेस्टिव्हल सुरू होणार आहे. येत्या २ नोव्हेंबरला एसआरकेचा वाढदिवस आहे. यानिमित्त या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. ३१ ओक्टोबरला हा फिल्म फेस्टिव्हल सुरू होणार असून शाहरुख खानने पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

शाहरुख खानने पोस्ट शेअर करत दिली माहिती

शाहरुख खानने इन्स्टग्रामवर याबद्दल पोस्ट करत, “माझे काही चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत, त्यामध्ये मी होतो तसाच आजही आहे; फक्त केस जरा वेगळे आहेत आणि आता मी अधिक छान दिसत आहे” असं म्हटलं आहे. यावेळी त्याने खाली द शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हल ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारतातील काही ठराविक चित्रपटगृहांत हे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे.

शाहरुख खानचे ‘हे’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानचे ‘मै हू ना’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘देवदास’, ‘दिल से’, ‘कभी हा कभी ना’, ‘जवान’ आणि ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांचा समावेश आहे; त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचे हे गाजलेले चित्रपट चित्रपटगृहात पाहता येणार आहेत. शाहरुख खानचे यातील काही चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाले होते तेव्हा या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला.

दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यामध्ये त्याच्यासह त्याची लेक सुहाना खानसुद्धा झळकणार आहे. यासह या चित्रपटात दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे.