छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल, रश्मिका मंदाना व अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळाले. तर चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून चांगली कमाई करीत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ६०० कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंतचा या वर्षातील सर्वाधिक चालणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला भारतासह बाहेरील देशांमध्येही भरभरून प्रतिसाद मिळाला. अशातच आता चित्रपटात शंभूराजेंच्या भूमिकेत पाहायला मिळालेला अभिनेता विक्की कौशलच्या वडिलांनी म्हणजेच शाम कौशल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आभार मानले आहेत.

विक्कीचे वडील व प्रसिद्ध अॅक्शन डिरेक्टर शाम कौशल यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. शाम कौशल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘छावा’ चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळत असून, या फोटोवर “६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. ‘पुष्पा २ हिंदी’, ‘स्त्री २’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे”, असं लिहिलं आहे. या पोस्टखाली ‘छावा’ चित्रपटाला एवढा चांगला प्रतिसाद देण्यासाठी आभार, असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे. तर या पोस्ट खाली अनेकांनी ‘छावा की शान में चमका बॉक्स ऑफिस’, ‘जय श्री राम’, ‘अभिनंदन’ अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत.

चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे, “चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली तेव्हाच आम्हाला जाणवत होतं की आम्ही काहीतरी भव्य करत आहोत. शौर्य, युद्ध, असं कथानक असलेल्या चित्रपटानं जगभरात ८०० कोटींची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचा आहे आणि चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे”. तर ‘छावा’ची निर्मिती करीत दिनेश विजन यांनी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे.

‘छावा’ चित्रपटाला देशातील कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या विक्की कौशलचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होताना दिसलं. यासह चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना यांचं कामही अनेकाना भावलं. तर चित्रपटात महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळाली. ऐतिहासिक भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. तर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचंही प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होताना दिसलं. १४ फेब्रवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात अनेक मराठमोळे कलाकार झळकले. अभिनेता संतोष जुवेकर, सारंग साठे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.