Shehnaaz Gill Buys a New Car: ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वातून अभिनेत्री शहनाझ गिलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या निरागस स्वभावाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबरोबरच्या तिच्या नात्याचीदेखील मोठी चर्चा झाली.
अभिनेत्रीने काही म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. तसेच ती काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोशल मीडियावरदेखील ती सक्रिय असते.शहनाझ गिलचा चाहतावर्ग मोठा आहे. आता मात्र, अभिनेत्री तिच्या कामामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करीत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
शहनाझ गिलने घेतली १.५ कोटींची कार
शहनाझ गिलने एक नवीन कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोट्यवधी आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ जीएलएस ही कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत १.५७ ते १. ६५ कोटींदरम्यान आहे. नवीन गाडी घेतल्याने शहनाज आनंदी असल्याचे दिसत आहे. तिने तिच्या या नवीन गाडीबरोबर अनेक फोटो काढले आहेत. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तिने गाडीबरोबर पोझ दिली आहे. तर काही फोटोंमध्ये ती गाडीची पूजा करत असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने गाडी घेण्याचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे लिहिले. तसेच, आता तिच्या कष्टाला चार चाके असल्याचे तिने म्हटले. पुढे तिने देवाचे आभारदेखील मानले आहे.
शहनाझ गिलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन”, “अशीच प्रगती करत राहा”, “तुझ्यासाठी खूप आनंदी आहे”, “तुला ही गाडी शोभते”, अशा प्रकारच्या कमेंट्स करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शहनाझ गिल अभिनेत्री भूमी पेडणेकरबरोबर ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘हौसला रख’, ‘काला शाह कला’, अशा चित्रपटांतदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. आगामी काळात ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.