Shilpa Shetty and Raj Kundra Mumbai Police LOC : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योजक राज कुंद्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. काही दिवसांआधीच शिल्पाच्या हॉटेलला टाळं लावण्याची वेळ आली. त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना लुकआऊट नोटीस (LOC) बजावली आहे.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर सुमारे ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केलं आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे अनेकदा परदेशात जात असतात, त्यामुळे ते आता देशाबाहेर जाऊ नयेत, म्हणून LOC काढण्यात आली आहे. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर एका व्यावसायिकाला कर्ज आणि गुंतवणुकीच्या नावाखाली फसवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १० कोटींपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार असल्यामुळे याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. जुहू येथील रहिवासी आणि लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक कोठारी यांनी ही तक्रार केली आहे.
कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, राजेश आर्य नावाच्या व्यक्तीने त्यांची ओळख राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी करून दिली. हे दोघं Best Deal TV Pvt. Ltd. या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. त्यावेळी या कंपनीतील ८७.६% शेअर्स या दोघांच्या नावावर होते, असं सांगितलं जात आहे.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४०३, ४०६ आणि ३४ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. आता पोलिस गुंतवलेले पैसे कुठे वापरले गेले आणि कोणत्या उद्देशासाठी खर्च झाले याचा तपास करत आहेत.
पीटीआय, आयएएनएसच्या माहितीनुसार आणि इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपक कोठारी यांचा आरोप आहे की, एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी ‘शेअर सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंट’ अंतर्गत कंपनीत ₹३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी अॅग्रीमेंट अंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये ट्रान्सफर केले.
एफआयआरनुसार, एप्रिल २०१६ मध्ये वैयक्तिक हमी (पर्सनल गॅरंटी) देण्यात आली होती, तरीही शिल्पा शेट्टीने सप्टेंबर २०१६ मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कोठारी यांना समजलं की, २०१७ मध्ये कंपनीने कर्जाचे व्यवहार चुकवल्यामुळे दिवाळखोरीची प्रक्रिया (बँकरप्सी) सुरू केली होती.