Shilpa Shirodkar Death Rumours : अलीकडच्या काळात एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नानाविध प्रकारच्या युक्त्या लढवल्या जातात, जेणेकरून चित्रपट येण्यापूर्वी त्याची चर्चा व्हावी. मात्र तुम्हाला माहितीय का? १९९५ साली आलेल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा ‘पब्लिसिटी स्टंट’ करण्यात आला होता. त्याबद्दल स्वत: त्या अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने १९९५ साली आलेल्या ‘रघुवीर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या आणि त्या अफवांचा नेमका उद्देश तिनं नुकत्याच घेतल्या गेलेल्या तिच्या एका मुलाखतीत सांगितला. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पानं सांगितलं, “मी कुलू-मनालीत सुनील शेट्टीबरोबर शूटिंग करीत होते. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल फोन नसल्याने माझे वडील हॉटेलमध्ये फोन करण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा आजूबाजूचे लोक माझ्याकडे बघत होते आणि विचार करत होते की, ही खरी शिल्पा आहे की दुसरी कोणी? कारण- तेव्हा सर्वत्र माझी गोळ्या घालून हत्या झाल्याची बातमी पसरली होती.”
अभिनेत्री पुढे म्हणते, “शूटिंगनंतर जेव्हा मी माझ्या खोलीत गेली, तेव्हा मला २०-२५ मिस्ड कॉल्स आले होते. एका वृत्तपत्रात छापून आलं होतं की, शिल्पा शिरोडकरला गोळी मारण्यात आली आहे आणि यात तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आई-वडील घाबरले होते आणि घाबरून त्यांनी अनेक फोन केले होते.” या सगळ्यामागे असलेलं खरं कारण पुढे स्पष्ट झालं. चित्रपटाचे निर्माते गुलशन कुमार यांना या अफवांचा वापर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापर करायचा होता हे त्याचं कारण होतं.
शिल्पा शिरोडकर इन्स्टाग्राम पोस्ट
त्याबद्दल शिल्पा म्हणाली, “जेव्हा गुलशनजींनी मला सांगितलं की, ही प्रमोशनल ट्रिक होती, तेव्हा मी फक्त ‘ओके’ म्हटलं. पण हो, हे थोडंसं जास्तच झालं. त्या वेळी पीआर किंवा मीडियाला काहीच कळत नव्हतं. मला सगळ्यात शेवटी हे समजलं. तेव्हा कोणीच परवानगी विचारायचं नाही; पण तो चित्रपट चालला म्हणून मी फारशी रागावले नाही.”
दरम्यान, शिल्पाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर शिल्पा शिरोडकर लवकरच तेलुगू भाषेतील ‘जटाधारा’ या थरारपटात झळकणार आहे. हा चित्रपट अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्यातील लपलेल्या गूढ कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वेंकट कल्याण करीत आहेत आणि झी स्टुडिओजनं याची निर्मिती केली आहे. प्रमुख भूमिकेत सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकार आहेत.