Shirdi Ke Sai Baba fame Actor Sudhir Dalvi Hospitalized: ‘शिरडी के साई बाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती खालावली आहे. सुधीर दळवींना ८ ऑक्टोबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ८६ वर्षीय दळवी सेप्सिसने ग्रस्त आहेत. उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे कुटुंबीय संघर्ष करत आहेत. सुधीर दळवींच्या कुटुंबाने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
मूव्ही टॉकीजच्या वृत्तानुसार, सुधीर दळवी यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या उपचारांच्या खर्चासाठी पैसे नाहीत. रुग्णालयाचे बिल आधीच १० लाख रुपयांच्या पुढे गेले आहे आणि उपचारांचा एकूण खर्च १५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुधीर दळवींच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करा, अशी विनंती त्यांच्या नातेवाईकांनी फिल्म इंडस्ट्रीतील लोक व चाहत्यांना केली.
रणबीर कपूरच्या बहिणीने केली मदत
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऋषी कपूर यांची मुलगी व रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने सुधीर दळवी यांना मदतीचा हात पुढे केला आहे. तिने सुधीर दळवींच्या मेडिकल फंडमध्ये देणगी दिली. तिने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, “डन. ते लवकर बरे व्हावे.” यानंतर काहींनी “फूटेज पाहिजे म्हणून मदत केली” म्हणत रिद्धिमाला ट्रोल केलं.
रिद्धिमा कपूर साहनी ट्रोलर्सना उत्तर देत म्हणाली, “आयुष्य सगळं काही फक्त दिखावा नसतो. गरजू व्यक्तीला मदत करणे आणि आपल्या क्षमतेनुसार जे काही करता येईल ते करणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.”
सुधीर दळवींचे करिअर
‘शिरडी के साई बाबा’ ही सुधीर दळवी यांची सर्वात गाजलेली भूमिका होय. त्यांनी चित्रपट आणि टीव्हीवर काम करून स्वतःची ओळख तयार केली. त्यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ (१९८७) या महाकाव्यात ऋषी वशिष्ठ यांची भूमिका केली होती. तेसच १९७८ साली आलेल्या ‘जुनून’ चित्रपटात आणि १९८९ च्या ‘चांदनी’ चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.
१९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला सुधीर दळवी अभिनयविश्वात सक्रिय होते. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या. ते शेवटचे २००३ च्या ‘एक्सक्यूज मी’ चित्रपटात दिसले होते आणि नंतर २००६ मध्ये ‘वो हुए ना हमारे’ या मालिकेत त्यांनी काम केलं होतं.
