Shreyas Talpade Rejected Jolly LLB : श्रेयस तळपदे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्याने हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? श्रेयसनं ‘जॉली एलएलबी’ या लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटाला नकार दिला होता. अशातच अभिनेत्यानं त्यामागचं कारण सांगितलं आहे.

श्रेयस तळपदेनं ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटासाठी अभिनेता अर्शद वारसीच्या आधी श्रेयसला विचारणा झालेली. परंतु, त्यानं नकार दिल्याने ही भूमिका अर्शदकडे गेली.

श्रेयस तळपदेने ‘या’ कारणामुळे जॉली एलएलबीला दिलेला नकार

श्रेयस याबद्दल मुलाखतीत म्हणाला, “मला आठवतं की, सुभाष कपूर यांना भेटल्यानंतर त्यांनी मला कथा सांगितलेली. त्यावेळी मी इतर कामांत व्यग्र होतो. त्यामुळे गोष्टी जुळून आल्या नाहीत. पण, काही वर्षांनंतर जेव्हा ‘जॉली एलएलबी’ प्रदर्शित झाला तेव्हा मी तो चित्रपट पाहिला आणि लगेच त्यांना फोन करून अभिनंदन केलं.”

श्रेयस याबद्दल पुढे म्हणाला, “मी त्यांना सांगितलं की, सर खूप छान चित्रपट आहे. मला खूप आवडला. कामही खूप छान आहे त्यातलं. तेव्हा सुभाषसर हसत म्हणाले, तुला आठवत नाही का? मी तुला या चित्रपटासाठी विचारलेलं. मी म्हटलं नाही सर, मला तुम्हाला भेटल्याचं आठवतं; पण हा तो चित्रपट नव्हता. ते म्हणाले नाही तो हाच चित्रपट होता. मी त्यात फक्त काही बदल केले आहेत. पण सुरुवातीला हे कथानक मी तुला ऐकवलेलं.”

श्रेयस तळपदेने व्यक्त केली खंत

श्रेयस तळपदे पुढे याबद्दल सांगताना म्हणाला, “जेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं तेव्हा मला धक्काच बसला. मी त्यांना म्हटलं, प्लीज असं म्हणा की, हा तो चित्रपट नव्हता. पण दुर्दैवानं हा तोच चित्रपट होता. मला माहीतच नव्हतं की, मी इतकी मोठी संधी गमावली आहे.”

‘जॉली एलएलबी’बद्दल बोलायचं झालं तर, २०१३ साली सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झालेला. त्यामध्ये अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्याबरोबर सौरभ शुक्ला मुख्य भूमिकांत झळकलेले. त्यानंतर २०१७मध्ये ‘जॉली एलएलबी २’ प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार झळकला आणि आता ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, अमृता राव हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. येत्या १९ सप्टेंबरला ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदे नुकताच टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ या चित्रपटात झळकला. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेता संजय दत्तदेखील पाहायला मिळाला. त्याव्यतिरिक्त अलीकडे श्रेयस अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व दिग्दर्शक अजय मयेकर यांच्याबरोबर स्पॉट झाला होता. त्यामुळे आता श्रेयस कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.