स्मिता पाटील यांनी मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली होती. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, स्मिता पाटील यांच्या ‘अर्थ’, ‘मंडी’, ‘भूमिका’, ‘बाजार’, ‘गमन’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिकांनी आजही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अलीकडेच स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने रमेश सिप्पींच्या ‘शक्ती’ सिनेमाच्या सेटवरील आपल्या आईचा एक किस्सा सांगितला. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी एकत्र काम केलं होतं. खऱ्या आयुष्यात सुद्धा हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.
वरिंदर चावलाशी संवाद साधताना प्रतीक म्हणाला, “माझी आई स्मिता पाटील… ‘शक्ती’ सिनेमाच्या सेटवर एक मोठा लंच बॉक्स घेऊन जायची. सेटवर ब्रेक झाला की, सगळ्या लाइटमनबरोबर जमिनीवर बसून जेवायची. आई तेव्हा मोठी सुपरस्टार होती, तरीही ती जमिनीवर बसून जेवत असे. एके दिवशी आई जेवत असताना अचानक तिथे अमिताभ बच्चन आले.”
प्रतीक पुढे म्हणाला, “अमिताभ बच्चन यांनी आईला जमिनीवर बसून जेवताना पाहिलं आणि नंतर तिला बाजूला बोलावलं, तिला सांगितलं ‘ऐक…तू असं सगळ्यांबरोबर जमिनीवर बसून जेवतेस…यामुळे आमची वागणूक वेगळी दिसतेय. आम्ही जर तुझ्याप्रमाणे वागलो नाही तर त्यांच्या नजरेत वाईट होऊ. आता आम्हाला सुद्धा असंच जेवायला बसावं लागेल. नाहीतर आमची प्रतिमा वाईट होऊ शकते.’ बिग बींना ती गोष्ट खटकली होती पण, माझी आई बिनधास्त होती. तिने त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या व्हॅनमध्ये जाऊन जेवा…मी इथेच जेवेन.”
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यात व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगला समन्वय होता. काही वर्षांपूर्वी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, ‘नमक हलाल’च्या शूटिंगदरम्यान स्मिता खूप अस्वस्थ होती कारण, तिला समजत नव्हतं की तिला चित्रपटात जे करायला सांगितलं होतं ते ती का करत आहे. पण, यानंतर बिग बींनी तिच्याशी चर्चा केली होती. स्मिता वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त खंबीर होती असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.