Sonu Nigam Faces Police Complaint Over Pahalgam Remark : बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणजे सोनू निगम. सोनू निगमने आजवर आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याच्या आवाजाचे आज केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात लाखों चाहते आहेत. आपल्या गाण्यांमुळे कायमच चर्चेत असणारा सोनू निगम त्याच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडला आहे. नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने गायकाकडे कन्नड गाण्याची मागणी केली असता सोनू निगमने त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली आणि यामुळेच सोनू निगमविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोनू निगमच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये तो हिंदी गाणं गात असताना एका विद्यार्थ्याने ‘कन्नड कन्नड’ ओरडत कन्नडमध्ये गाणं गाण्याची मागणी केली. यावर सोनूने मध्येच गाणे थांबवले आणि म्हटले की, “मी माझ्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत, परंतु मी गायलेली सर्वोत्तम गाणी कन्नडमध्ये आहेत. मी जेव्हा जेव्हा तुमच्या शहरात येतो, तेव्हा मला खूप प्रेम आणि आदर मिळतो. तुम्ही माझ्यावर कुटुंबीयांसारखे प्रेम केले आहे. पण जेव्हा माझ्या कारकिर्दीइतकंही वय नसलेलं मुलं येऊन असं वागतं तेव्हा ते वाईट वाटते.” यापुढे त्याने “यामुळेच पहलगामसारख्या घटना घडतात” असंही म्हटलं.

सोनू निगमने चाहत्याने त्याच्याकडे जी मागणी केली होती, त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी गायकाच्या असंवेदनशील वागण्याबद्दल आक्षेप घेतला आहे. यामुळेच कर्नाटक रक्षण वेदिके (केआरव्ही) या प्रमुख कन्नड संघटनेने बेंगळुरूमध्ये पोलिसांत सोनू निगम विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच सोनू निगमकडे जाहीर माफी मागण्याची विनंती केली आहे. माफी मागिल्याशिवाय राज्यात त्यांचे कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा पवित्रादेखील त्यांनी घेतला आहे.

कर्नाटक रक्षण वेदिके (केआरव्ही) या प्रमुख कन्नड संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीत “हे विधान केवळ असंवेदनशीलच नाही तर धोकादायकदेखील आहे. एका साध्या विनंतीला दहशतवादी घटनेशी जोडून, ​​सोनू निगमने कन्नडिगा लोकांना असहिष्णु, भाषिक द्वेष भडकवणारे आणि सांप्रदायिक सलोखा धोक्यात आणणारे म्हणून चित्रित केले आहे” असे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणी सोनू निगमवर कलम ३५२(१), ३५१(२), आणि ३५३ अंतर्गत शत्रुत्व, बदनामी आणि भाषिक भावना भडकवल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी या गटाने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी अद्याप गायक सोनू निगमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आता या वादावर सोनू त्याचे काय प्रतिक्रिया देतो? आणि तो केआरव्ही गटाच्या मागणीनुसार माफी मागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोनू निगमच्या गायनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आजवर एकूण ३२ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात हिंदीव्यतिरिक्त कन्नड, बंगाली, मराठी, तेलुगू, तमिळ, ओडिया, इंग्रजी, आसामी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाळी, तुळु, आणि मणिपुरी भाषांचा समावेश आहे.