Sonu Sood Takes Responsibility Of Baby : बॉलीवूडच्या काही दानशूर कलाकारांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेता सोनू सूद. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने गरजूंची मदत केली. त्यानंतरही त्यानं मदतीचा हा ओघ सुरू ठेवला. सोनूच्या घराबाहेर दररोज मदत मागणाऱ्यांची रांग लागते आणि तो स्वत: त्यांची वैयक्तिक भेट घेऊन तक्रारी ऐकतो. अशातच आता तो एका तान्ह्या बाळाच्या मदतीसाठी धावून आला आहे.

‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील डुल्लमचक गावात ६ नोव्हेंबरला झालेल्या एका घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण, या पीडित कुटुंबासाठी सोनू सूद देवदूत बनला. मृत्यू झालेल्या महिलेच्या पश्चात १० महिन्यांचा मुलगा आहे आणि या मुलाच्या भविष्यातील शिक्षणाची जबाबदारी सोनू सूदने घेतली आहे.

लहान मुलाचे वडील रोहित राय यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. “माझी पत्नी काल माझ्याबरोबर होती; पण आज ती माझ्याबरोबर नाहीय… आता फक्त मी आणि माझा मुलगा राहिलोय. मला माहीत नाही. उद्या मी असेन की नाही. जर सोनू सूद माझ्या मुलाची जबाबदारी घेऊन, त्याच्या शिक्षणाची काळजी घेणार असतील, तर मला मोठा आधार मिळेल”, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भुमिहार-ब्राह्मण एकता मंच फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आशुतोष कुमार यांनी व्हिडीओ कॉलद्वारे याबद्दल सोनू सूदला माहिती दिली. या दु:खद घटनेबद्दल कळताच सोनू भावूक झाला आणि त्यानं या लहान बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. अभिनेत्यानं आश्वासन दिलं की, सूद चॅरिटी फाउंडेशन या बाळाचं केजी ते पीजीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणार आहे.

सोनू सुद इन्स्टाग्राम पोस्ट

त्याबद्दल आशुतोष कुमार यांनी नंतर माहिती देत सांगितलं, “या घटनेची माहिती मिळताच सोनू सूद यांनी जाहीर केलं की, सूद चॅरिटी फाउंडेशन बाळाच्या भविष्यातील शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेईल. त्यांच्या या उदारतेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.” दरम्यान, याआधी सोनू सूदनं अनेक गरजूंना मदत केली आहे. अशातच त्यानं या बालकाच्या शिक्षणासाठी घेतलेला निर्णय कौतुकास पात्र आहे.

बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून सक्रीय असणारा सोनू सूद हा जणू काही एक समाजसेवक म्हणूनही कार्य करताना दिसतो. कोविडच्या काळात त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली. ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध करून देणे असो वा, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना आपपल्या घरी पोहोचवणे असो… तो अनेकांच्या मदतीला धावून गेला आहे. पंजाबमधील पुरग्रस्तांच्या मदतीलाही तो धावून आला होता.