Priyamani Talks About Causin Vidya Balan : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत, पण बऱ्याचशा प्रेक्षकांना याबद्दल माहिती नसतं. असंच एक नातं म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी यांचं. या दोघी खरंतर एकमेकांच्या चुलत बहिणी आहेत, पण त्या एकमेकांबरोबर बोलत नाहीत.
अभिनेत्री प्रियामणीने एका मुलाखतीत विद्या बालनबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने ती तिची बहीण विद्याबरोबर बोलत नसल्याचं म्हटलं आहे. ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी विद्याबद्दल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे नातेवाईक असूनही कधीच एकमेकींबरोबर बोलत नाही.”
प्रियामणीने विद्या बालनचं केलं कौतुक
प्रियामणी पुढे म्हणाली, “मी तिच्या वडिलांबरोबर बालन काकांबरोबर बोलते. आम्ही रोज बोलतो, जेव्हा माझ्याबरोबर बोलणं होत नाही तेव्हा ते माझ्या वडिलांना फोन करतात.” विद्या बालनबद्दल प्रियामणी पुढे म्हणाली, “ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती पुन्हा स्क्रीनवर कधी दिसणार याची मी वाट पाहत आहे, प्रेक्षक म्हणून मी तिचं काम बघण्यासाठी उत्सुक आहे.”
प्रियामणी याच मुलाखतीत दीपिका पादुकोणच्या दिवसाला ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दलही बोलली आहे.प्रियामणीने “प्रत्येकाने थोडं मागे पुढे झालं तरी जुळवून घेऊन काम केलं पाहिजे, काही वेळेला असं होतं, जेव्हा तुम्हाला जास्त वेळ काम करावच लागतं,” असं म्हटलं आहे.
प्रियामणीने या मुलाखतीत शाहरुख खानला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी त्यांना इतक्या जवळून ओळखत नाही की त्यांना पुरस्कार मिळाला म्हणून मेसेज करून अभिनंदन करेन, पण त्यांना पुरस्कार मिळतोय यासाठी मी खूप उत्सुक होते. मी त्यांच्या मॅनेजरला पूजा ददलानीला मेसेज केला आणि सांगितलं की माझ्याकडून त्यांना अभिनंदन कर.”
दरम्यान, प्रियामणी लवकरच ‘फॅमिली मॅन ३’ या सीरिजमधून झळकणार आहे. ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या या लोकप्रिय सीरिजमध्ये ती सुचित्रा ही भूमिका साकारत आहे.