एका सुपरमॉडेलने फक्त एक बॉलीवूड चित्रपट केला होता, पण हाच त्याचा शेवटचा चित्रपट ठरला होता. यश चोप्रा यांच्या चित्रपटामध्ये त्याला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी दिली. त्याचा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच यश यांनी त्याला दुसऱ्या चित्रपटात घेतलं होतं. पण पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि या मॉडेलचं अभिनयातील करिअर संपलं. या अभिनेत्याने नंतर नाव बदलून देशही सोडून दिला.
या मॉडेल, अभिनेत्याचं नाव म्हणजे दीपक मल्होत्रा. त्याने अनिल कपूर व श्रीदेवी यांच्याबरोबर एका चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटात श्रीदेवींची दुहेरी भूमिका होती.
कोण आहे दीपक मल्होत्रा?
दीपक मल्होत्राचा (Deepak Malhotra) जन्म बंगळुरूमध्ये झाला होता. ८० च्या दशकात त्याने रॅम्प मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. बंगळुरूत दीपकची प्रचंड चर्चा होती. ‘विमल’साठी त्याने १९८७ साली तब्बल १.५ लाख रुपये मानधन घेतलं होतं. तो त्याकाळी देशातील सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल होता. त्याच काळात त्याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि दीपकने यश चोप्रा दिग्दर्शित ‘लम्हे’ हा रोमँटिक चित्रपट पदार्पणासाठी निवडला.
त्या शब्दामुळे उडवली गेली खिल्ली
‘लम्हे’ मध्ये श्रीदेवी, अनिल कपूर, वहिदा रहमान, अनुपम खेर यांच्या भूमिका होत्या. श्रीदेवीने या चित्रपटात आई आणि मुलगी पल्लवी व पूजा या दुहेरी भूमिका भूमिका साकारल्या होत्या. दीपकने पल्लवीचा प्रियकर, पती सिद्धार्थची भूमिका साकारली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि दीपकच्या अभिनयाबद्दल खूप टीका झाली. चित्रपटात एक सीन आहे जिथे पल्लवी भोवळ येऊन पडते आणि सिद्धार्थ तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो ‘पल्लो’ ज्या पद्धतीने म्हणतो त्याची खूप खिल्ली उडवली गेली होती. त्या सीनचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
…अन् दीपक मल्होत्राचं करिअर संपलं
‘लम्हे’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यश चोप्रा यांनी दीपकला त्यांच्या ‘डर’ सिनेमासाठी साईन केलं होतं. पण ‘लम्हे’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर यश चोप्रांनी दीपकच्या जागी सनी देओलला घेतलं. दीपकच्या ‘बेखुदी’ला कमल सदाना, ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खानची आणि ‘जुनून’मध्ये राहुल रॉयची वर्णी लागली. १९९१ मध्ये जो दीपक शाहरुख खान आणि आमिर खान सारख्या तरुण अभिनेत्यांना तगडी टक्कर देईल असं मानलं जात होतं, त्याला १९९३ मध्ये ऑफर येणंच बंद झालं. त्यानंतर दीपक अभिनयच नाही तर देश सोडून अमेरिकेला निघून गेला. ‘लम्हे’ व्यतिरिक्त दीपकचा एकमेव सिनेमा आला होता, त्याचं नाव ‘तेजस्विनी’. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
दीपक मल्होत्रा आता काय करतो?
१९९४ मध्ये दीपक कायमचा न्यूयॉर्कला निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने नाव बदललं. दीपक मल्होत्रा डिनो मार्टेली झाला. विदेशात गेल्यावरही त्याने मॉडेलिंग सुरू ठेवले आणि शिक्षण पूर्ण केलं. त्याने २०१८ मध्ये स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. आता तो त्या ब्रँडचं काम सांभळतो. त्याने फॅशन कोरिओग्राफर लुबना अॅडमशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फॅशन इंडस्ट्रीत आले. त्यांनी मनीष मल्होत्रासाठी मॉडेलिंग केलं आहे.