बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. तो अंमली पदार्थांची तस्करी करत होता. त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोटींमध्ये आहे.

चेन्नई कस्टम व महसूल गुप्तचर संचालनालय केलेल्या संयुक्त कारवाईत या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून साडेतीन किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ३५ कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटनने रविवारी पहाटे सिंगापूरहून आल्यावर अभिनेत्याला (तपास एजन्सींनी नाव गुप्त ठेवले आहे) अटक केली. या अभिनेत्याने स्टुडंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहे. अभिनेत्याच्या चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा अधिकाऱ्यांना त्याच्या ट्रॉलीमध्ये लपवलेले पांढरे पावडरसारखे पदार्थ असलेले प्लास्टिकचे पाउच आढळले.

अभिनेत्याच्या बॅगमध्ये सापडलेल्या त्या पावडरची फील्ड ड्रग टेस्ट करण्यात आली. त्यातून ते कोकेन असल्याचं निश्चित झालं. त्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली. तो कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला आला होता, अशी माहिती चौकशीदरम्यान उघड झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला कंबोडियामध्ये अज्ञात व्यक्तींनी ही ट्रॉली दिली आणि ती चेन्नई विमानतळावरील रिसीव्हरला देण्यास सांगितलं होतं, असं तो चौकशीत म्हणाला.मात्र, तो ड्रग कार्टेलसाठी ती ट्रॉली मुंबई किंवा दिल्लीला घेऊन जाणार होता, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.

डीआरआय अधिकारी त्याच्याशी संबंधित ड्रग्ज नेटवर्कचा तपास करत आहेत. तर, कस्टम्स त्याच्या त्याची ट्रॅव्हल हिस्ट्रीची चौकशी करत आहे, जेणेकरून त्याने यापूर्वी ड्रग्जची तस्करी केली होती का, याचा शोध घेता येईल.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात चेन्नई विमानतळावर डीआरआयने कोकेन जप्त करण्याची ही दुसरी घटना आहे. १६ सप्टेंबर रोजी इथिओपियाहून आल्यावर एका केनियाच्या नागरिकाला २ किलो कोकेनसह अटक करण्यात आली होती. १ सप्टेंबर रोजी चेन्नई कस्टम्सने फेरेरो रोचर चॉकलेट कॅनमध्ये लपवलेले ५.६ किलो कोकेन जप्त केले होते आणि इथिओपियाहून आलेल्या दोन प्रवाशांना अटक केली.