लोकप्रिय दिवगंत अभिनेते संजीव कपूर यांचं हेमा मालिनींवर प्रेम होतं. हेमा व संजीव लग्न करणार होते, पण हेमा यांनी ऐनवेळी नकार दिला आणि नंतर धर्मेंद्र यांच्याबरोबर संसार थाटला. संजीव यांना शबाना आझमीही आवडायच्या, पण त्यांच्या आईला मुस्लीम सून नको होती, त्यामुळे ते नातं कधीच पुढे गेलं नाही.

नऊ वर्षांच्या असल्यापासून सुलक्षणा पंडित रंगमंचावर आणि चित्रपटांमध्ये काम करत होती. तिने १९६७ साली लता मंगेशकर यांच्याबरोबर ‘सात समंदर पार से, पापा जल्दी आना’ मधील ‘तकदीर’ पासून सुरुवात केली. नंतर अनेक गाणी गायली, चित्रपटही केले. तिने किशोर कुमार व मोहम्मद रफी यांच्याबरोबर परफॉर्म केलं होतं.

सुलक्षणा यांचे भाऊ जतिन पंडित एकदा म्हणालेले, “सुलक्षणा परफॉर्म करायची, त्यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.” दिलीप कुमार यांनी सुलक्षणाला सुरुवातीच्या काळात संगीतकार नौशाद यांच्याकडे पाठवलं. तिला १३ व्या वर्षी मोहम्मद रफी यांनी गाताना ऐकलं आणि नंतर परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केलं. “आमच्या कुटुंबातून पहिल्यांदा सुलक्षणा मोहम्मद रफीबरोबर परदेशात गेली होती” असं जतिन म्हणाले होते.

सिनेमा करताना प्रेमात पडली सुलक्षणा

सुलक्षणा पंडितने गायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली. नंतर अभिनयात पाऊल ठेवलं. तिचा पहिला चित्रपट ‘उलझन’ (१९७५) संजीव कुमार यांच्याबरोबर होता. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान ती संजीव यांच्या प्रेमात पडली. तेव्हा संजीव हेमा मालिनीबरोबरच्या प्रेमभंगातून सावरत होते. सुलक्षणा अनेकदा संजीवच्या प्रेमाबद्दलच्या गोष्टी ऐकायची. संजीव तिच्यासमोर मन मोकळं करायचे. त्याच काळात ती त्यांच्या प्रेमात पडली. संजीवही आपल्यावर प्रेम करतील, असं तिला वाटत होतं.

Sanjeev Kumar and Sulakshana Pandit on the set of film Uljhan
सजीव कुमार व सुलक्षणा यांचा उलझन चित्रपटाच्या सेटवरील फोटो (सौजन्य – एक्सप्रेस आर्काइव्ह)

सुलक्षणाने प्रपोज केलं, पण…

नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. संजीव प्रेमभंगामुळे दुःखी होते, त्यातच ते दारू पिऊ लागले. नंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बायपास सर्जरीसाठी त्यांना अमेरिकेला नेण्यात आलं. उपचारानंतर परत आल्यावर सुलक्षणाने त्यांना प्रेम आणि श्रद्धेने एका मंदिरात नेलं. तिने संजीव यांना प्रपोज केलं, पण त्यांनी नकार दिला. पण तरीही, तिने कधीच त्याची साथ सोडली नाही. ती त्यांची काळजी घेत राहिली आणि मदत करत राहिली, असं म्हटलं जातं.

सुलक्षणा पंडितने अनेक गाणी गायली, चित्रपट केले. पण संजीव यांचं १९८५ साली निधन झालं आणि तिला मोठा धक्का बसला. संजीव गेल्यानंतर ती नैराश्यात गेली. तिच्या आईचंही निधन झालं, यामुळे ती प्रचंड हादरली. “या लोकांच्या मृत्यूचा माझ्यावर कायमस्वरुपी परिणाम झाला. माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. मी बराच काळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, हादरले होते,” असं सुलक्षणा एका मुलाखतीत म्हणाली होती.

पुढे सुलक्षणाला कामाच्या ऑफर मिळणं कमी झालं. सुलक्षणा आयुष्यात पुढे जाऊ शकली नाही. २००६ मध्ये, तिची धाकटी बहीण विजयता पंडित आणि तिचे पती, संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी सुलक्षणाला सोबत राहायला नेलं. त्यांनी काळजी घेतल्याने तिची प्रकृती सुधारली, परंतु त्या दुःखातून ती सावरू शकली नाही.