‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, अशी माहिती मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याविषयी उत्सुकता होती. परंतु, काही दिवसांपासून या चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या चर्चांमुळे आता प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं. अशातच आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरू होणार होतं; परंतु इतक्यात परेश रावल यांनी या चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं.
परेश रावल यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये याबाबत खुलासा केला होता. त्यासह त्यांनी एक्सवर पोस्ट करीत याबद्दल त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, चित्रपटातील त्यांचे सहकलाकार अभिनेते सुनील शेट्टी यांनी परेश रावल यांच्या चित्रपटातील एक्झिटवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉलीवूड बबल’च्या वृत्तानुसार सुनील शेट्टी म्हणाले, “मी किंवा अक्षय कुमार नसलो तरी ‘हेरा फेरी ३’ चित्रपट बनवला जाऊ शकतो; पण परेश रावल यांच्याशिवाय हा चित्रपट बनवणं अशक्य आहे.”
सुनील शेट्टी यांनी यापूर्वी मंगळवारी (२० मे) ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याने त्यांना धक्का बसल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले, “परेशनं चित्रपटातून एक्झिट घेतली याबद्दल मला माझ्या मुलांकडून कळलं. तोपर्यंत मला याबाबत काहीही माहीत नव्हतं. माझं कोणाशीही या संदर्भात बोलणं झालं नव्हतं. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा मी त्याला मेसेज करणार होतो; पण आता भेटूनच यावर त्याच्याशी चर्चा करू, असं ठरवलं.”
दरम्यान, ‘हेरा फेरी’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर २००० साली पहिल्यांदा ‘हेरा फेरी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये परेश रावल यांनी बाबू भैया,अक्षय कुमारने राजू, सुनील शेट्टी यांनी श्याम अशा तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी त्यांनाही कदाचित याची कल्पना नसावी की, त्यांच्या या भूमिका अजरामर होणार आहेत. या तिघांच्याही अप्रतिम अभिनयामुळे ‘हेरा फेरी’ हा चित्रपट चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यानंतर २००६ साली ‘फिर हेरा फेरी’ या नावाने त्याचाच दुसरा भाग प्रदर्शित झाला. त्या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अशातच आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती.