अभिनेते सुनील शेट्टी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नायक, खलनायक, विनोदी अशा धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजवर त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सुनील शेट्टी यांच्यापाठोपाठ आता त्यांचा मुलगा अहान शेट्टीसुद्धा बॉलीवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करु पाहत आहे. अहान सध्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
अशातच आता सुनील शेट्टी यांनी नुकताच त्यांच्या मुलाबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा खुलासा केला आहे. सुनील यांनी ‘झूम’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी मुलगा अहानबरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. अहान ‘बॉर्डर २’ चित्रपटात काम करीत आहे म्हणून त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्या मुद्दाम प्रसारित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, “मी अहानला सांगितलं आहे की, तू यापुढे चित्रपटात काम कर किंवा करू नको; पण ‘बॉर्डर २’ चित्रपटाला तुझं १०० टक्के दे. त्यावर तुझं सर्व लक्ष केंद्रित कर आणि हा तुझा शेवटचा चित्रपट आहे, असं समजून काम कर.”
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “या चित्रपटासाठी त्यानं खूप सहन केलं आहे आणि त्याला खूप काही गमवावं लागलं. त्याला काही चित्रपटांमधून काढून टाकलं गेलं आणि नंतर त्याचा दोषसुद्धा त्यालाच देण्यात आला. पैसे देऊन त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्या लिहिण्यात आल्या.” त्याबाबत सुनील शेट्टी सूचना देत म्हणाले, “जर हे पुढे असंच सुरू राहिलं, तर मी पत्रकार परिषद घेऊन ज्यांनी हे केलेलं असेल, त्यांना अद्दल घडवेन.”
सुनील शेट्टी यांनी मुलाबद्दलच्या या प्रतिक्रियेसह नुकतीच ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून परेश रावल यांची एक्झिट झाल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “मला याबाबत काहीच माहिती नव्हती. ही बातमी मला माझ्या मुलांकडून कळली तेव्हा मला धक्काच बसला. परेश रावल यांच्याशिवाय ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट बनवता येणार नाही. एक वेळ मी किंवा अक्षय कुमार नसलो तरी हा चित्रपट पूर्ण होऊ शकतो; पण परेश यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्णच आहे.”