Sunita Ahuja says Govinda needs to lose weight : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने तिच्या पतीच्या वाईट संगतीबद्दल भाष्य केलंय. तसेच गोविंदा ज्योतिषी सांगतील तेच करतो. भविष्याबद्दल भाकित करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, गोविंदा एका पूजेसाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतो, असा खुलासाही सुनिताने केला आहे. गोविंदा आपलं अजिबातच ऐकत नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

पारस एस छाब्राशी बोलताना सुनीता म्हणाली, “आमच्या घरातही एक आहे, गोविंदाचा पंडित. तोही पूजा करण्यासाठी २ लाख रुपये देतो. मी त्याला सांगते की तू स्वतः प्रार्थना कर. इतरांनी केलेल्या पूजेचा तुला काहीच फायदा होणार नाही. तू स्वतः केलेल्या प्रार्थनाच देव स्वीकारेल. मी दान देत असेल किंवा चांगलं काम करत असेल तर ते स्वतः करते.”

तो मूर्ख लोकांबरोबर बसतो – सुनीता आहुजा

गोविंदाने लोकांचे सल्ले ऐकणं बंद करावं आणि स्वतःची काळजी घ्यावी, असंही सुनीताला वाटतं. “आता त्याला वजन कमी करावं लागेल. त्याला चांगलं दिसावं लागेल. त्याची त्वचा खराब झाली आहे. त्याने स्वतःची काळजी घ्यावी, ही माझी इच्छा आहे. तो अलीकडेच म्हणाला की तो तीन चित्रपट बनवत आहे, पण मला वाटतं त्याला चांगली टीम मिळत नाही. तो ज्या लोकांमध्ये बसतो तिथे मूर्ख लेखक असतात. खरं तर ते लेखक कमी आणि मूर्ख जास्त असतात,” असं सुनीता म्हणाली.

लोक त्याला माझ्या भडकवतात – सुनीता आहुजा

“ते त्याला वाईट सल्ले देऊन मूर्ख बनवतात. त्याला चांगले लोक भेटत नाहीत आणि मी खरं बोलते म्हणून त्यांना मी आवडत नाही. लोक त्याला माझ्याबद्दल काहीही बोलून भडकवतात आणि तो सर्वांवर विश्वास ठेवतो. मी त्या सर्वांना म्हणतेय की तुम्हाला जे काही बोलायचंय ते माझ्या तोंडावर बोला, त्याला बोलू नका,” असं सुनीता आहुजाने सुनावलं.

सुनीताने प्राण्यांसाठी आणि वृद्धांसाठी काहीतरी करायची इच्छा व्यक्त केली. “माझी मनापासून इच्छा आहे की मला एक वृद्धाश्रम आणि प्राण्यांसाठी शेल्टर होम बनवायचं आहे. मी हे माझ्या स्वतःच्या पैशाने करेन. मी गोविंदाकडून एक रुपयाही घेणार नाही कारण तो मला पैसे देणार नाही, तर तो फक्त त्याच्या चमच्यांना पैसे देतो,” असंही सुनीता म्हणाली.

दरम्यान, सुनीता व गोविंदा यांनी ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १९८७ साली लग्न केलं होतं. या जोडप्याने काही काळ त्यांच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नाच्या ३७ वर्षांनी गोविंदा व सुनीताच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत, कारण सुनीता गोविंदाबद्दल जाहीरपणे बऱ्याच गोष्टी बोलत आहे.