Mandhira Kapur on Karisma Kapoors kids inheritance share: उद्योगपती व बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे जून महिन्यात निधन झाले. त्यानंतर त्याच्या वारसा हक्क आणि मालमत्तेप्रकरणी वाद सुरू झाला आहे.
संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि करिश्माची मुले यांच्यात संपत्तीवरून कायदेशीर लढाई सुरू आहे. समायरा व कियान ही करिश्मा व संजयच्या मुलांची नावे आहेत. अशातच संजय कपूरची बहीण मंधीरा कपूरने केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.
मंधीरा कपूरने नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मंधीरा कपूरने प्रिया सचदेवमुळे करिश्मा व संजयचे नाते तुटले, असे वक्तव्य केले आहे. तसेच, प्रियामुळेच त्यांच्या नात्यात दुरावा आला, असे म्हटले आहे.
“ती नेहमीच आमच्या कुटुंबाचा…”
संपत्तीवरून होत असलेल्या वादावर मंधीरा म्हणाली, “संजयच्या मालमत्तेवर समायरा आणि कियानचा १००% हक्क आहे. करिश्मा कपूरच्या मुलांना वारसा हक्क मिळायला पाहिजे. माझ्या वडिलांनी आम्हा तीनही भावंडांना स्पष्टपणे सांगितले होते की, सहा नातवंडे त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहेत. त्यांनी असेही म्हटले होते की, जरी आम्हा भावंडांचे लग्न टिकले किंवा नाही तरी त्याचा परिणाम सहा नातवंडांवर होऊ नये.”
करिश्माबरोबर असलेल्या तिच्या नात्याबद्दल मंधीरा म्हणाली, “करिश्मा आमच्या घरातच वाढली आहे. आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो. आम्ही थोड्या काळासाठी एकमेकांशी बोलत नव्हतो; पण आता आमच्यात पूर्वीप्रमाणे नातेसंबंध आहेत. माझी आई आणि मी अजूनही तिच्याशी बोलतो. ती फक्त माझी बालपणीची मैत्रीण नाही, तर माझ्या कुटुंबाचाही भाग आहे. ती नेहमीच आमच्या कुटुंबाचा भाग होती आणि पुढेही राहील.”
मंधीरा कपूर असेही म्हणाली, “संजयनं त्याच्या मुलांसाठी काहीच संपत्ती मागे ठेवली नाही, हे खरं वाटत नाही. माझी आई म्हणाली होती की, संजय त्याच्या मुलांना असा सोडून जाणं शक्य नाही. माझ्या आईनं ते घर झाडाखाली बसून बांधून घेतलेलं आहे. आता तिच्याकडे घर नाही. सगळं काही प्रियाला मिळालं? हा तर चमत्कारच झाला. सर्वांनी असंच लग्न करायला पाहिजे. आमचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे आणि तिनं सर्व काही ताब्यात घेतलं आहे.”
गेल्या महिन्यात करिश्मा व संजय कपूरच्या मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी संजयच्या मृत्युपत्राला आव्हान दिले आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, या मृत्युपत्राबद्दल संजय किंवा प्रिया कपूर यांच्याकडून कोणतीही माहिती याआधी दिली गेली नव्हती. हे मृत्युपत्र बनावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“माझे वडील कधीच प्रियाला…”
याच मुलाखतीत मंधीराने असाही खुलासा केला की, प्रिया सचदेव व संजय कपूर यांचे लग्न वडिलांना मान्य नव्हते. ती म्हणाली, “माझे वडील कधीच प्रियाला भेटले नाहीत किंवा त्यांनी तिला कधीही पाहिलं नाही. ते त्यांच्या मतावर ठाम होते. माझी आई प्रियाबरोबर राहिली आहे. त्यांचं सासू-सुनेचं नातं चांगलं असावं. मला त्याबद्दल माहीत नाही. मी आणि प्रिया कधीच एकत्र राहिलो नाही. मी माझ्या आईबरोबर प्रियाबद्दल कधीही बोलली नाही.”
मंधीराने प्रियावर आरोप केला की, तिनं संपूर्ण कुटुंब वेगळ केलं आहे. “प्रियानं या टप्प्यावर हे कुटुंब एकत्र ठेवायला पाहिजं होतं; पण तिनं तसं केलं नाही. शेवटी ही माझ्या आईची मालमत्ता आहे; ही तिच्या पतीची म्हणजेच संजयची मालमत्ता नाही. ही मालमत्ता माझ्या आईला तिच्या पतीनं म्हणजेच माझ्या वडिलांनी दिली. कोणत्याही भारतीय कुटुंबाप्रमाणे, आमच्यापैकी कोणीही माझ्या भावानं सोना कॉमस्टार चालवण्यास आक्षेप घेतला नाही. कारण- तो मुलगा आहे.
माझ्या वडिलांनी संघर्ष केला आणि कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढलं. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनी माझ्या वडिलांनी जशी कंपनी ठेवली होती, तशा चांगल्या स्थितीत ठेवली नाही. संजयनं फक्त माझ्या वडिलांच्या आदेशाचं पालन केलं. त्यामुळे प्रियानं संजयने आर्थिक अडचणींमधून घराला वाचवलं आहे, असं म्हणणं म्हणणं चुकीचं आहे.”
याआधी संजय कपूरच्या आईनेदेखील त्यांची फसवणूक केल्याचे म्हटले होते.