Bobby Deol on Sunny Deol: बॉबी देओल नुकताच आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये दिसला. त्याच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
बॉबी देओल त्याच्या चित्रपट, सीरिजमधील भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत असतो. तसेच, अभिनेत्याच्या मुलाखतींमधील वक्तव्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते. बॉबी देओल अनेकदा कुटुंबाच्या पाठिंब्याबाबत, आई-वडिलांबाबत, तसेच भाऊ सनी देओलबद्दल त्याच्या भावना व्यक्त करतो.
“माझा तोल गेला आणि खूप जोरात…”
सनी देओलचे तो अनेकदा कौतुक करतो. सनी देओल फक्त त्याचा भाऊ नाही, तर तो वडिलांप्रमाणे असल्याचे बॉबी देओलने अनेकदा वक्तव्य केले आहे. बॉबी देओलने नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बॉबी देओलने ‘बरसात’ या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगितली. या चित्रपटातून बॉबी देओलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, बॉबी देओलला पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी सनी देओलने त्याला कशी मदत केली होती, याबद्दल अभिनेत्याने वक्तव्य केले.
बॉबी देओल म्हणाला, “मला अजूनही आठवतं की माझा पाय मोडला होता. त्यावेळी इंग्लंडमध्ये शूटिंग सुरू होतं. मी घोडेस्वारी करत होतो, त्यादरम्यान मी दुसऱ्या घोड्याला जाऊन धडकलो. माझा तोल गेला आणि खूप जोरात जमिनीवर पडलो. माझा एक पाय पूर्णपणे मुरगळला होता हे मी पाहिले. मी उठून उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण मी पुन्हा पडलो. भैया (सनी देओल) तिथेच होता. तो माझ्याकडे आला, त्याने मला त्याच्या खांद्यावर घेतलं आणि मला तो घेऊन आला. तो तिथे असताना माझ्याबरोबर काहीही वाईट घडू शकत नाही, हे मला माहीत होते.”
अभिनेता पुढे म्हणाला, “तो मला तेथील स्थानिक दवाखान्यात घेऊन गेला. पण, तेथील डॉक्टर त्याला म्हणाले की आम्ही त्याचा पाय बरा करू शकत नाही. त्यानंतर भैयाने मला एका रात्रीत विमानाने लंडनला नेले होते. माझ्या पायावर तिथे शस्त्रक्रिया करण्यात आली. माझा भाऊ कायम माझ्यासाठी तत्पर असतो.”
दुखापतीबद्दल बॉबी देओल म्हणाला, “मला दुखापत होऊन ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आजही माझ्या पायात रॉड आणि स्क्रू आहेत. कधीकधी वेदना होतात, पण मला आता सवय झाली आहे. मी चालू शकतो, डान्स करू शकतो, धावू शकतो, भांडू शकतो, एखाद्या व्यक्तीला आणखी काय पाहिजे असते?”
बॉबीने याआधीही सनी देओलचे अनेकदा कौतुक केले आहे. गेल्यावर्षी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडमध्ये बॉबीने सनीच्या शारीरिक आणि भावनिक शक्तीचे कौतुक केले होते. तो म्हणालेला की, जर वास्तविक जीवनात कोणी सुपरमॅन असेल तर तो भैया आहे. मी कधीही कोणालाही इतके सामर्थ्यवान पाहिले नाही. त्याच्या पाठीवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत, तरीही जेव्हा सीनमध्ये एखाद्या व्यक्तीला उचलण्याची आवश्यकता असते तेव्हा तो सहजपणे त्यांना उचलतो.