बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतल्या प्रेमकथांपैकी एक म्हणजे ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी. दोघांनीही त्यांच्या काळात चित्रपटसृष्टीवर राज्य केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आता वेगवेगळ्या घरात राहत आहेत. बॉबी देओलने सांगितलं की धर्मेंद्र आता त्याची आई प्रकाश कौर यांच्याबरोबर खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये राहत आहेत. दुसरीकडे, हेमा मालिनी त्यांच्या बंगल्यात एकट्या राहतात. आज आपण धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती किती आणि या दोघांपैकी कोण श्रीमंत आहे ते जाणून घेऊया.
विवाहित धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले अन्…
१९७० मध्ये, धर्मेंद्र हेमा मालिनी यांना ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चित्रपटात काम करतानाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनींच्या प्रेमात पडले तेव्हा धर्मेंद्र विवाहित होते व चार मुलांचे वडील होते.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या व धर्मेंद्र यांच्या पहिल्या भेटीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. दोघे पाहता क्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. “धर्मेंद्र यांना पाहून मला जाणवले की हाच तो माणूस आहे ज्याच्याबरोबर मी माझे संपूर्ण आयुष्य घालवू इच्छिते,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.
पांच वर्षे डेट केल्यावर धर्मेंद्र व हेमा यांनी केलेलं लग्न
धर्मेंद्र व हेमा यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनीशी दुसरे लग्न केले. २ मे १९८० रोजी एका खासगी समारंभात त्यांनी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याला ईशा आणि अहाना या दोन मुली झाल्या.

धर्मेंद्र यांची संपत्ती किती?
Dharmendra Net Worth: डीएनएच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ३४० कोटी रुपये आहे. धर्मेंद्र यांनी चित्रपटांमधून भरपूर कमाई केली आणि गुंतवणूकही केली. ते खूप लक्झरी आयुष्य जगतात. त्यांच्याकडे सुमारे १०० कोटी रुपयांचे एक फार्महाऊस आहे. तसेच रेंज रोव्हरसह इतरही लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.
हेमा मालिनी यांची संपत्ती किती?
Hema Malini Net Worth: हेमा मालिनी आता चित्रपटांमध्ये नाही तर राजकारणात सक्रिय आहेत. त्या मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार आहेत. हेमा मालिनी यांच्याकडे घर व लक्झरी गाड्या आहेत. हेमा मालिनी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती १२३.६ कोटी रुपये आहे.