Rhea Chakraborty Talks About Sushant Singh Rajput : रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या केसमुळे तिच्या कुटुंबीयांना व तिला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने या केसमुळे तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं आणि आता काहीही आधीसारखं राहिलेलं नाही, असं म्हटलं आहे.
रिया चक्रवर्तीनं नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं सुशांत सिंह राजपूतच्या केसमधून तिला क्लीन चीट मिळाल्यानंतर तिच्या काय भावना होत्या? याबद्दलची माहिती दिली आहे. रिया म्हणाली, जेव्हा सीबीआयनं तिला या केससंदर्भात क्लीन चिट दिली तेव्हा तिच्या घरातील सगळ्यांना अश्रू अनावर झालेले.
रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया
अभिनेत्री म्हणाली, “त्या दिवशी माझ्या घरातील सगळे रडत होते. मी माझ्या भावाला मिठी मारली आणि ढसाढसा रडले. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांकडे पाहिलं तेव्हा मला जाणवलं की, आता सगळंच बदललं आहे. आम्ही आता कधीही पूर्वीप्रमाणे कुठल्याही गोष्टीची चिंता नसणारे कुटुंबीय राहिलेलो नाही.”
रिया म्हणाली, “सगळ्यात आधी माझ्या आईनं हे वृत्तनाहिनीवर पाहिलं; पण सुरुवातीला तिचा यावर विश्वास बसत नव्हता. कारण- साहजिक आहे; तिला वाटलं की, मीडिया नेहमीप्रमाणे उगाच काहीही सांगत असेल. पण, जेव्हा आमच्या वकिलांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आमचा या गोष्टीवर विश्वास बसला.”
रिया पुढे म्हणाली, “जेव्हा मला निर्दोष ठरवण्यात आलं, तेव्हा मला आनंद झाला नाही. कारण- माझ्या खूप जवळची व्यक्ती हे जग सोडून गेली होती आणि ते सत्य बदलणं शक्य नव्हतं. पण मला आई-वडिलांसाठी दिलासा वाटला. ते समाजात राहतात, सतत लोकांच्या संपर्कात असतात. त्यांच्यासाठी परिस्थिती खूप कठीण झाली होती. मला वाटलं, कदाचित आता ते थोडं मोकळेपणानं फिरू शकतील,”
रियाने यासह सांगितलं की, त्या धक्कादायक घटनेनं तिच्या आई-वडिलांचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. ती पुढे म्हणाली, “लोक म्हणायचे की, तो तुझ्यामुळे गेला नाही. मला माहीत होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये; पण तरीही जेव्हा निर्दोष ठरवलं गेलं, तेव्हाही मला आनंद झाला नाही. मी फक्त आई-वडिलांसाठी आनंदी होते.”
रिया म्हणाली की, ती नेहमीच सत्याच्या बाजूनं चालत आली आहे; पण मीडियानं चालवलेला खटला आणि दीर्घकाळ सुरू राहिलेली चौकशी यामुळे संपूर्ण कुटुंबावर प्रचंड ताण आला. “आम्ही पूर्वीप्रमाणे आनंदी, मोकळं आयुष्य जगणारं कुटुंब राहिलो नव्हतो,” असंही तिनं सांगितलं.