संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. काहींना हा चित्रपट आवडला तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. जावेद अख्तर आणि स्वानंद किरकिरे यांनीही ‘अ‍ॅनिमल’वर टीका केली. हिंसाचार आणि महिलांबद्दलच्या दृष्टिकोनापासून ते गैरवर्तन आणि वादग्रस्त संवादांपर्यंत चित्रपटात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या ज्यांची चांगलीच चर्चा झाली. आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही आता ‘अ‍ॅनिमल’वर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे ती असे चित्रपट कधीच करणार नाही असे वक्तव्यही तिने केले आहे.

‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये रणबीर कपूर व रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात बरेच आक्षेपहार्य दृश्य, संवाद असल्याने समाजातील एक मोठा वर्ग या चित्रपटाच्या विरोधात होता. चित्रपटसृष्टीतही यावरुन दोन गट पडले होते. ‘अ‍ॅनिमल’सारखा चित्रपट हीट होणं हा समाजासाठी खूप मोठा धोका असल्याचं वक्तव्यही बऱ्याच लोकांनी केलं होतं.

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ येणार ओटीटीवर; प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनकट व्हर्जन

नुकतंच राज शमानी या प्रसिद्ध युट्यूबरच्या पॉडकास्ट शोमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने हजेरी लावली अन् यावेळी तिने ‘अ‍ॅनिमल’वर भाष्य केलं. ती चित्रपटाची चाहती नसून अद्याप तिने हा चित्रपट पाहिलेला नसल्याचंही स्पष्ट केलं. तापसी म्हणाली, “बऱ्याच लोकांनी मला ‘अ‍ॅनिमल’बद्दल सांगितलं, मी एक्स्ट्रिमिस्ट नाहीये त्यामुळे मी बऱ्याच लोकांशी असहमत आहे. या चित्रपटाची तुलना हॉलिवूडशी कृपया करू नये. जर ‘गॉन गर्ल’ आवडला असेल तर ‘अ‍ॅनिमल’ आवडायला काय हरकत आहे असं तर कुणीच बोलू नये. आपला प्रेक्षकवर्ग पूर्णपणे वेगळा आहे. हॉलिवूडचा प्रेक्षक अभिनेत्याच्या हेअर स्टाईलची नक्कल करत नाही, ते खऱ्या आयुष्यात फिल्मी डायलॉगचा वापर करत नाहीत.”

पुढे तापसी पन्नू म्हणाली, “एखादा चित्रपट बघून तिथला प्रेक्षक एखाद्या महिलेचा पाठलाग करायला लागत नाही. परंतु आपल्या देशात या सगळ्या गोष्टी घडतात, हे वास्तव आहे. तुम्ही आपल्या चित्रपटसृष्टीची तुलना हॉलिवूडशी करू शकत नाही. दोन्हीमधील फरक जाणून घेणं फार आवश्यक आहे.”

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे चित्रपट बनले पाहिजेत का? अन् तापसी यात काम करेल का? या प्रश्नांची उत्तरं देताना तापसी म्हणाली, “निश्चित असे चित्रपटही बनायला हवेत परंतु एक वेगळा उद्देश समोर ठेवून हे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटात कुणी काम करायला हवं आणि कुणी नाही हे सांगायचा अधिकार मला नाही, प्रत्येकजण सुजाण आहे. माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर किमान मी तरी अशा चित्रपटांमध्ये काम करण्यास इच्छुक नाही.”