Sameer Wankhede On Bads Of Bollywood: आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या मालिकेत बदनामीकारक भूमिका दाखवल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करणारे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सत्याचा विजय झाला पाहिजे असे म्हटले आहे. परंतु या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

आर्यन खानच्या नेटफ्लिक्सवरील मालिकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला त्यांचा मानहानीचा खटला फेटाळल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “मी या सर्वांवर भाष्य करणार नाही. मी फक्त एकच गोष्ट सांगेन, सत्यमेव जयते”, समीर वानखेडे म्हणाले.

समीर वानखेडे यांनी ड्रग्जच्या सेवनाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भाष्य केले. “आपल्या मुंबई परिसरात, ड्रग्जच्या सेवनाच्या समस्या, आणि उत्तर मुंबई किंवा पूर्व मुंबईत, कोणत्या प्रकारची ड्रग्ज अस्तित्वात आहेत याबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे”, असे ते म्हणाले. ड्रग्ज विरोधातील जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या शिबिरात त्यांनी हे विधान केले.

समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स आणि इतरांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेबसीरीज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मालिका नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. समीर वानखेडे यांनी दावा केला आहे की, या मालिकेत त्यांच्यांसारखे दिसणारे एक पात्र दाखवण्यात आले आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

न्यायालयाने समीर वानखेडे यांना विचारले होते की “हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी त्याची कारणे सांगा.” न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव म्हणाले होते की, “राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?”

‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या मालिकेतील चित्रण हे खोटे व बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्ययालयात केली होती.