The Bengal Files Box Office Collection Day 1 : ‘द बंगाल फाइल्स’ हा बहुचर्चित सिनेमा ५ स्प्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे; तर विवेक अग्निहोत्री यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं जाणून घेऊयात…

पल्लवी जोशी व विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकदा तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु, अखेर काल हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ‘द बंगाल फाइल्स’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एकूण १.७५ कोटीची कमाई केली आहे.

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या अहवालानुसार ‘द बंगाल फाइल्स’ला भारतातील चेन्नई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई, जयपूर, अहमदाबाद या शहरांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते.

‘द बंगाल फाइल्स’बरोबर बॉक्स ऑफिसवर ५ सप्टेंबर रोजी टायगर श्रॉफचा ‘बागी ४’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल १२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे टायगर श्रॉफच्या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं. ‘द बंगाल फाइल्स’च्या तुलनेत ‘बागी ४’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई केली आहे.

‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट १९४६ च्या बंगाल दंगली आणि नोआखाली हत्याकांडावर आधारित असून, हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित झाला नाहीये. परंतु, देशातील इतर भागांत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काल (५ सप्टेंबर) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच मुंबईतील कांजूरमार्ग येथील हुमा मॉल येथील चित्रपटगृहात या चित्रपटाचे शो अचानक रद्द करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर यासंबंधित व्हिडीओ शेअर करीत संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर, दर्शन कुमार, सैरव दास, पुनित इस्सर या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.