Archana Puran Singh Networth : अर्चना पूरण सिंह या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या कपिल शर्माच्या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहेत. सध्या हा कार्यक्रम ‘नेटफ्लिक्स’वर ‘दी ग्रेट इंडियन कपिल शो’ या नावाने प्रसारित होत आहे. यातीलच एका भागात त्यांनी त्यांच्या मानधनाबद्दल सांगितलेलं.

अर्चना पूरण सिंह या कार्यक्रमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा मुंबईत आलिशान व्हिलाही आहे. अर्चना पूरण सिंह यांचा आज वाढदिवस आहे. यंदा त्या ६३वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त अर्चना यांची एकूण संपत्ती किती आहे जाणून घेऊयात… ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार २०१९पासून त्या कपिल शर्माच्या कार्यक्रमातून जज म्हणून पाहायला मिळत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा तिसरा सीझन संपला आहे.

तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात त्यांनी त्यांच्या मानधनाबद्दल सांगितलेलं की, यासाठी त्यांना भरपूर फी मिळते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाच्या शेवटच्या भागात अक्षय कुमारने हजेरी लावलेली. त्यावेळी त्याने सगळ्यांबरोबर खूप गप्पा मारत मजा केलेली पाहायला मिळाली. अक्षयने कपिलच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं की, पूर्वी तो एका सीझनमध्ये किमान ८० एपिसोड तरी करायचा आणि गमतीत तो म्हणाला की, आता १० एपिसोड कमी झाल्याने अर्चनाच्या मानधनावर परिणाम झाला आहे. यावर अभिनेत्री म्हणाल्या, जरी एपिसोड कमी झाले असले तरी ‘नेटफ्लिक्स’मुळे त्यांच्या मानधनावर काहीही परिणाम झाला नाही.

अर्चना पूरण सिंह किती मानधन घेतात?

Siasat.comच्या वृत्तानुसार अर्चना पूरण सिंह एका एपिसोडसाठी १०-१२ लाख रुपये इतकं मानधन घेतात; तर त्या या कार्यक्रमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. तिसऱ्या सीझनच्या १० एपिसोडसाठी त्यांनी जवळपास १.२ कोटी इतकं मानधन घेतलं.

अर्चना पूरण सिंह यांची नेटवर्थ किती आहे?

अर्चना या मुंबईतील मढ आयलंड या परिसरात आलिशान व्हिलामध्ये राहतात. शहरी जीवनातील घाई-गडबडीपासून त्या थोड्या शांततापूर्ण वातावरणात राहतात. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका फराह खानने तिच्या यूट्यूब ब्लॉगमधून अर्चना यांच्या सुंदर व्हिलाची झलक दाखवलेली. ‘बॉलीवूड बबल’च्या एका अहवालानुसार त्यांच्या या आलिशान व्हिलाची किंमत जवळपास तब्बल ७० कोटी रुपये इतकी आहे.

अर्चना यांच्याकडे याव्यतिरिक्त महागड्या गाड्यांचं कलेक्शनही आहे. त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ ई-क्लास, ऑडी ए८, बीएमडब्ल्यू, जॅग्वार एफ पेस, रोवर रेंज रोवर इवोक आणि पोर्श पैनामेरासारख्या आलिशान आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे.