Tiger Shroff’s Mother Ayesha Shroff Slams Troller’s : कलाकारांसाठी ट्रोलिंग हा काही नवीन विषय नाही. जसे प्रेक्षक त्यांच्या कामासाठी त्यांचं कौतुक करतात तसंच काही प्रेक्षक काहीवेळा त्यांच्यावर टीकाही करतात. अशातच लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफलाही एका नेटकऱ्याने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अभिनेत्याच्या आईने त्याला स्पष्ट उत्तर दिलं.
टायगर श्रॉफ सध्या त्याच्या ‘बागी ४’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटासंबंधीत व्हिडीओ व फोटो पाहायला मिळत आहेत. यातील एका व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने टायगरला स्टंटमन म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
टायगर श्रॉफला ट्रोल करणाऱ्याला आयशा श्रॉफ यांनी दिलं स्पष्ट उत्तर
सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने “एक स्टंटमन कधी अभिनेता होऊ शकत नाही. तो एक चांगला स्टंटमन आहे.” अशी कमेंट केलेली. यावर टायगर श्रॉफच्या आईने “मी तुम्हाला टीका करण्याआधी बागी ४ बघण्याचा सल्ला देइन” असं उत्तर दिलं.

टायगरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्टंट करण्याबद्दल आणि अभिनयाबद्दल सांगितलेलं. ‘लल्लनटॉप’च्या वृत्तानुसार अभिनेता म्हणालेला की, स्टंट आणि अॅक्शन करताना त्याला जास्त मजा येते आणि अभिनयक्षेत्रात त्याला स्वत:ला सिद्ध करायचं आहे.
टायगर श्रॉफबद्दल बोलायचं झालं तर त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेलं. अभिनयासह त्याला नृत्याचीही तितकीच आवड असून तो एक उत्तम नर्तकही आहे. अनेक चित्रपटातील गाण्यामध्ये तो त्याच्या डान्स स्टेप्सने अनेकांची मनं जिंकतो.
दरम्यान, टायगर श्रॉफचा ‘बागी ४’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘बागी ४’मध्ये टायगरबरोबर हरनाझ संधू, सोनम बाजवा, संजय दत्त, श्रेयस तळपदे, उपेंद्र लिमये महेश ठाकूर हे कलाकार झळकणार आहेत. बागी फ्रँचायजीचा हा चौथा चित्रपट असून नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील अभिनेते उपेंद्र लिमये व श्रेयस तळपदे यांच्या भूमिकांनी लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बागी ४’ बरोबर विवेक अग्नीहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपटही ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.