सोनम खान ही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिदेव’ चित्रपटामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. सोनमचे खरे नाव बख्तावर खान होते आणि ती अभिनेते मुराद यांची नात आणि रझा मुराद यांची भाची आहे.
सोनम खान ‘त्रिदेव’ चित्रपटातील ‘तिरछी टोपी’ या गाण्याने रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. यश चोप्रांनी तिला सोनम हे नाव दिलं होतं, असं म्हटलं जातं. १५ व्या वर्षी सोनमने ‘सम्राट’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर, १६ व्या वर्षी तिने ‘विजय’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सोनमने अमिताभ बच्चन, ऋषी कपूर अशा अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केलं होतं. ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और सोना’, ‘क्रोध,’ ‘प्यार का कर्ज’, ‘अजूबा’, ‘फतेह’, ‘कोहराम’, ‘विश्वात्मा’, ‘बाज’ आणि ‘इन्सानियत’ हे सोनम खानचे गाजलेले चित्रपट आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये २० हून अधिक चित्रपट केले. १९९१ मध्ये तिची भेट राजीव राय यांच्याशी झाली. दोघे सेटवर भेटले, मैत्री झाली, जवळीक वाढली मग प्रेमात पडले आणि ३ वर्षे डेट केल्यावर सोनम व राजीव यांनी लग्न केलं.
१९ व्या वर्षी केलेलं १७ वर्षांनी मोठ्या राजीवशी लग्न
लग्न केलं तेव्हा सोनम १९ वर्षांची होती आणि तिचा नवरा राजीव तिच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठा होता. तेव्हा राजीवचं वय ३६ वर्षे होतं. लग्नानंतर वर्षभराने सोनमला मुलगा झाला. तिने २० व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, तो जन्मतः ऑटिस्टिक होता. त्यांच्या मुलाचं नाव गौरव राय आहे.
राजीव रायशी लग्न केल्यानंतर तिला अंडरवर्ल्डकडून धमक्या येऊ लागल्या, त्यामुळे तिने लग्नानंतर अवघ्या सहा वर्षांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई सोडून ती पतीबरोबर ब्रिटनला निघून गेली. विदेशात गेल्यावर सोनम व राजीव यांच्या नात्यात दुरावा आला. पुढे दोघे वेगळे झाले. सोनमचे पहिले लग्न २०१६ मध्ये मोडले.
सोनम मुलाचा सांभाळ एकटीच करत होती. पहिलं लग्न मोडल्यावर काही वर्षांनी सोनमने पुन्हा एका हिंदू व्यक्तीशी लग्न केले. तिला पहिल्या लग्नापासून असलेला मुलगा गौरव राय देखील तिच्या दुसऱ्या लग्नाला उपस्थित होता. सोनमच्या दुसऱ्या पतीचं नाव मुरली आहे. सोनम व मुरलीची भेट पुद्दुचेरीत झाली होती. दोघांनी २०१७ साली उटी येथे लग्न केलं होतं.