Bollywood Actor shares his son doesnt watch Hindi movies: दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर हा गोलमाल या चित्रपटातील त्याच्या अनोख्या भूमिकेसाठी ओळखला जातो. ‘गोलमाल’च्या तीनही भागांत तो दिसला होता. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
तुषार कपूरची बहीण एकता कपूर ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील निर्माती व दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय आहे. वडील आणि बहिणीप्रमाणे तुषार कपूरदेखील मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, अभिनेत्याला सहज यश मिळाले नाही.
सुरुवातीच्या काळात त्याच्या जवळजवळ सर्व भूमिकांवर टीका झाली. तुषार कपूरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला मुझे कुछ कहना है, जीना सिर्फ मेरे लिए, क्या दिल ने कहा, खाकी, क्या कुल है हम अशा चित्रपटांत काम केले. आता अभिनेत्याने त्याच्या मुलाबाबत वक्तव्य केले आहे.
“तुला ती भाषा…”
तुषार कपूरने नुकतीच ‘बीबीसी न्यूज हिंदी’शी संवाद साधला. या मुलाखतीत त्याने त्याचा मुलगा अभिनय क्षेत्रात करिअर करणार का, तसेच तो हिंदी चित्रपट पाहतो का, चित्रपटांविषयी मुलांबरोबर होणाऱ्या गप्पा यांवर वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “माझ्या मुलानं मला विचारले की, तू इंग्रजी चित्रपटात का काम करत नाहीस? त्यावर मी त्याला म्हणालो की, आपण भारतात राहतो. आपल्याला हिंदी चित्रपटांत काम करावं लागतं. त्यावर तो म्हणाला की, मग मी चित्रपट पाहू शकत नाही. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मी त्याला सांगितलं की, तुला ती भाषा माहीत आहे.”
तुषार या मुलाखतीत असेही म्हणाला की, माझा मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंटेट मोठ्या प्रमाणात पाहतो. पण, मी त्याला हिंदीचे क्लास लावले आहेत. जर भविष्यात त्याला अभिनेता व्हायचं असेल, तर त्याला याचा उपयोग होईल. अभिनेता म्हणाला, “माझा मुलगा यूट्यूब मोठ्या प्रमाणात पाहतो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मॅच पाहतो. तो बहुतेक कंटेट इंग्रजीमध्ये बघतो. त्यामुळेच आता मी त्याला हिंदी शिकण्यासाठी पाठवत आहे. त्याचे हिंदीचे वर्ग सुरू केले आहेत. कारण- तो शाळेत स्पॅनिश शिकत आहे. त्याने हिंदी विसरू नये, असे मला वाटते. कारण- जर त्याला नंतरच्या आयुष्यात चित्रपटांमध्ये काम करायचे असेल, तर त्याला हिंदी यायला हवी. मी हिंदी चित्रपट पाहत मोठा झालो आहे.”
तुषारच्या कामाबद्दल बोलायचे, तर २००१ ला प्रदर्शित झालेल्या ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केले. ‘गोलमाल’च्या मालिकेव्यतिरिक्त अभिनेत्याच्या खाकी, शूटआउट अॅट लोखंडवाला, शोर इन द सिटी यांसारख्या चित्रपटांतील भूमिका लोकप्रिय ठरल्या. तुषार कपूर नुकताच कपकापी या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसला होता. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात श्रेयस तळपदेदेखील प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता आगामी काळात अभिनेता कोणत्या भूमिकेत दिसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुषार कपूरच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे, तर तो अविवाहित आहे. २०१६ मध्ये सरोगसीद्वारे तो पालक बनला आहे.