Twinkle Khanna recalls being called Rishi Kapoor’s illegitimate daughter : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ऋषी कपूर यांची सून आणि अभिनेत्री आलिया भट्ट व वरुण धवन यांनी त्यांचा पहिला चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मध्ये त्यांच्याबरोबर काम केलं होतं. दोघांनी काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये त्यांच्या खास आठवणींना उजाळा दिला.
वरुण धवनने सांगितली मजेशीर आठवण
वरुणने स्टुडंट ऑफ द इयरच्या सेटवरील ऋषी कपूर यांची एक मजेदार आठवण सांगत वरुण म्हणाला, “मला आठवतंय की मी सिद्धार्थ मल्होत्राबरोबर फुटबॉलचा एक सीक्वेन्स केला होता. त्यावेळी आमच्या केसांमध्ये खूप जेल लावण्यात आलं होतं, त्यामुळे ऋषीजी खूश नव्हते. ते नेहमी म्हणत, ‘हे काय आहे? तुमचे केस हलत नाहीत. गारपीट असो वा वादळ, तुमचे केस असेच राहतात. तुम्ही फुटबॉल खेळता, तेव्हा तुमचे केस उडायला पाहिजेत.'”
ऋषी कपूर वरुणजवळ यायचे आणि त्याच्या केसांना स्पर्श करायचे. नंतर त्यांनी दिग्दर्शक करण जोहरला फोन करून याबद्दल तक्रार केली. करणने वरुणला समजावलं. मग वरुण म्हणाला, ‘माझ्या केसांमध्ये जेल आहे.’ ऋषी कपूर रागावले आणि त्यांनी आग्रह धरला, “केसांमधील हे जेल काढणार नाही, तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही.” अखेर वरुणला केसांमधील जेल काढावं लागलं होतं.
राहा ऋषी कपूर यांच्यासारखी आहे – आलिया भट्ट
आलिया भट्टने रणबीर कपूरशी लग्न करण्यापूर्वी, कपूर अँड सन्स चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या आठवणी शेअर केल्या. “मी त्यावेळी रणबीरला डेट करत नव्हते, पण आम्ही (ती आणि ऋषी कपूर) दररोज संध्याकाळी बाहेर फिरायचो. ते खूप छान गोष्टी सांगायचे. ते शूटिंगनंतर सर्वांना गप्पा मारायला, एकत्र जेवायला बोलवायचे. मला त्यांची खूप आठवण येते. आता, जेव्हा जेव्हा लोक राहाला पाहतात तेव्हा ते म्हणतात की ती मिनी ऋषी कपूर आणि आलिया भट्ट आहे. तिच्यात त्यांच्यासारखीच ऊर्जा आहे,” असं आलिया म्हणाली.
ट्विंकल खन्नाला लोक ऋषी कपूरची अनौरस मुलगी म्हणायचे
शोची होस्ट ट्विंकल खन्नाने ऋषी कपूरशी संबंधित एक विनोदी प्रसंग सांगितला. “आलियाच्या सासऱ्यांमुळे मी जवळजवळ कपूर झाले होते. माझ्या वाढदिवशी त्यांनी ट्विट केलं होतं. ‘अरे तुला माहित आहे का… तू तुझ्या आईच्या पोटात असताना, मी तिच्यासाठी गाणी गायली होती.’ त्यामुळे सर्वांना वाटले की मी त्यांची अनौरस मुलगी आहे. त्या ट्विटनंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं, शेवटी त्यांना माफी मागत स्पष्टीकरण द्यावे लागलं होतं.
काजोल हे ऐकून चकित झाली. दुसरीकडे आलिया भट्ट हे ऐकून गोंधळली, त्याकडे काजोलने लक्ष वेधलं. त्यावर लगेच “मी तुझी नणंद नाही, ती चूक होती,” असं ट्विंकल म्हणाली. वरुण मजेशीरपणे म्हणाला की यावर कशी प्रतिक्रिया द्यावी ते आलियाला सुचत नाहीये.
दरम्यान, ऋषी कपूर आणि ट्विंकल खन्नाची आई, ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी राज कपूर यांच्या १९७३ साली आलेल्या क्लासिक ‘बॉबी’ चित्रपटातून एकत्र बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.