Nana Patekar on What He Love Most About Himself: नाना पाटेकर हे त्यांनी साकारलेल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे ओळखले जातात. आता लवकरच ते ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहेत. नुकताच ‘हाऊसफुल ५’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘हाऊसफुल ५’च्या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर एका वेगळ्या भूमिकेत दिसले आहेत. आता मात्र त्यांच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर अभिनेते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी म्हातारा होणार नाही, असे वक्तव्य केले आहे.
मी म्हातारा होत नाही…
नाना पाटेकर म्हणाले, “मला माझ्यातली सगळ्यात आवडती गोष्ट कोणती, तर मी म्हातारा होत नाही आणि मी होणारही नाही. माझा एक मित्र जाड झालेला होता. मी शूटिंग करून आलो होतो. मी त्याला म्हणालो की, अरे किती जाड झालास, आयुष्यभर लोक शिव्या देतातच, पण निधनानंतर जेव्हा उचलतात, तेव्हादेखील शिव्या देतील.” पुढे ऑपरेशन सिंदूरला सलाम आहे, असे म्हणत नाना पाटेकरांनी ऑपरेशन सिंदूरबाबत भावना व्यक्त केल्या.
नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. विविध सामाजिक विषयांवर ते परखड मत व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर हे माझ्यापेक्षाही स्पष्टवक्ते असल्याचे म्हटले होते. तसेच नाना पाटेकरांनी एका निर्मात्याला घरी बोलावून मटण खायला दिले होते. तसेच त्याच्याकडून भांडी स्वच्छ करून घेतल्याचा किस्सादेखील सांगितला होता.
अभिनेते नाना पाटेकर यांनी आजपर्यंत मराठीसह हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. ‘भालू’, ‘आज की आवाज’, ‘परिंदा’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘अग्नी साक्षी’, ‘तिरंगा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘युगपुरूष’, ‘वजूद’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. ‘नटसम्राट’मधील त्यांचा ‘कोणी घर देत का घर’ हा डायलॉग प्रचंड गाजला. तसेच ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने’ हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.
आता नाना पाटेकरांची ‘हाऊसफुल ५’मधील भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.