Parag Tyagi Reaction on Wife Shefali Jariwala Death: प्रसिद्ध अभिनेत्री व ‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकप्रिय झालेली शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी (२७ जून रोजी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीवर मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीला पती पराग, कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींनी अखेरचा निरोप दिला. शेफालीचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर पराग त्यागीचा भावुक व्हिडीओ समोर आला आहे.

‘पवित्र रिश्ता’ फेम पराग त्यागीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीचं अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झालं. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर पराग माध्यमांसमोर हात जोडून उभा राहिला आणि त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. परागचा हा हृदयद्रावक व्हिडीओ वरिंदर चावलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

भावुक पराग म्हणाला, “प्लीज तुम्ही चेष्टा करू नका. सगळे माझ्या परीसाठी प्रार्थना करा. ती जिथे असेल तिथे खूश राहावी, शांततेत राहावी.” यानंतर त्याने सर्वांना शूटिंग थांबवण्याची विनंती केली.

पाहा व्हिडीओ-

शेफालीला शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यावर परागने तिला अंधेरी येथील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनानंतर तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पराग अंधेरी येथे घरी परतला. पोलीस व फॉरेन्सिक टीम प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याच्या घरी आले होते. दुपारपर्यंत पराग त्यांना तपासात सहकार्य करत होता. त्यानंतर तो पत्नीचे पार्थिव नेण्यासाठी कूपर रुग्णालयात आला.

शेफाली व परागचे कुटुंबीय रात्रीपासून रुग्णालयात होते. नंतर त्यांचे मित्रदेखील तिथे पोहोचले. सर्वजण शेफालीचे पार्थिव घेऊन घरी आले, त्यानंतर तिची अंत्ययात्रा निघाली. शेफालीला ओशिवारा स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिथे उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेफालीच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तर परागला शेफालीला शेवटचं पाहून रडू कोसळलं. शेफाली व पराग १५ वर्षांपासून एकत्र होते. पत्नीच्या निधनामुळे पराग पूर्णपणे खचला आहे. अंत्यसंस्कारानंतर त्याने सर्वांना शेफालीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.