फिल्म इंडस्ट्रीत अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर रोमान्स केला. पण १५ वर्षांपूर्वी, एका तरुण अभिनेत्रीने ३७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका केली होती. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ही भूमिका करताना काहींनी तिला करिअर संपेल, असा इशाराही दिला होता. पण तो चित्रपट हिट ठरला आणि अनेक अवॉर्ड्सही मिळाले.
ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन होय. तिने मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त होईल, असं तिला अनेकांनी म्हटलं होतं. पण विद्याने सर्वांना चुकीचं ठरवलं. अभिनेत्रीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाशी संबंधित आठवणी शेअर केल्या होत्या.
विद्या बालनने ‘पा’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली होती. तिने ही भूमिका करण्यास होकार दिल्यावर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘पा’ चित्रपट रिलीज होऊन आता १५ वर्षे झाली आहेत. विद्यानेही इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली आहेत.
“जेव्हा दिग्दर्शक आर. बाल्की यांनी पहिल्यांदा विद्याला या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा तिला वाटलं की ‘बाल्की वेडे झाले आहेत.’ ते म्हणाले की अभिषेक व मला बच्चन साहेबांच्या आई-वडिलांच्या भूमिकेत घेऊ इच्छितात. हे ऐकून मला विचित्र वाटलं होतं. पण नंतर त्यांनी मला पूर्ण स्क्रिप्ट ऐकवली आणि माझा दृष्टीकोन बदलला. माझ्यातील अभिनयाची आवड मला सांगत होती की मी हा चित्रपट करायला हवा,” असं विद्या म्हणाली.
अनेकांनी म्हटलं करिअर संपेल
विद्याने म्हटलं होतं की या भूमिकेसाठी अनेकांनी तिला सावध केलं होतं. तू अशी भूमिका केलीस तर तुझं करिअर संपेल. त्यानंतर विद्याने चित्रपटाची स्क्रिप्ट काही जवळच्या मित्रांना ऐकवली. त्यापैकी एक लेखक व एक चित्रपट निर्माता होते. त्यांनी तिला हा चित्रपट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुणाचंच ऐकलं नाही आणि स्वतःला जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला, असं तिने सांगितलं.
चित्रपटाला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार
२००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पा’ चित्रपट सुपरहिट झाला होता. इतकंच नाही तर या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ‘ऑरो’ नावाच्या एका १२ वर्षांच्या मुलाची भूमिका केली होती. ऑरो प्रोजेरिया नावाच्या एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असतो. त्यामुळे त्याचे शरीर लवकर वृद्ध होऊ लागते.
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुलाची भूमिका केली होती. त्यांच्या वडिलांची भूमिका मुलगा अभिषेक बच्चनने तर आईची भूमिका विद्या बालनने केली होती. या चित्रपटाने इतिहास रचला होता. ‘पा’ सिनेमाला ‘बेस्ट हिंदी फीचर फिल्म’ व अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सिनेमाला एकूण १८ अवॉर्ड्स मिळाले होते. तर, विद्या बालनच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी ‘पा’ एक आहे. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.