बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीला ‘12th fail’ चित्रपटामुळे ओळख मिळाली. आयपीएस पोलीस अधिकारी मनोज शर्मा यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटातील अभिनयाद्वारे विक्रांतने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विक्रांतचा नवा चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच विक्रांत सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

७ फेब्रुवारी रोजी विक्रांत व त्याच्या पत्नीला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि वरदान त्यांच्या आयुष्यात आला. विक्रांत मेस्सीनं मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर त्याची पहिली झलक दाखवली. आपल्या लाडक्या लेकाचं नाव वरदान ठेवत विक्रांतनं त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली होती. “वरदान आमच्यासाठी आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. आम्ही आमच्या मुलाचं नाव वरदान ठेवलं आहे,” अशी कॅप्शन विक्रांतने या पोस्टला दिली आहे.

आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालेला लेक वरदान याची आठवण म्हणून आता विक्रांतने आपल्या लाडक्या लेकासाठी खास टॅटू काढला. विक्रांतने स्वत:च्या हातावर त्याच्या नावाचा आणि वाढदिवसाच्या तारखेचा खास टॅटू काढला आहे. या टॅटूचा फोटो विक्रांतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. “आयुष्यातली ही भर असो किंवा हे व्यसन असो. मला तशाही या दोन्ही गोष्टी खूप आवडतात,” असं कॅप्शन देत विक्रांतने ही स्टोरी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… “आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”, कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “चला हवा येऊ द्या…”

दरम्यान, विक्रांतच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, विक्रांत ’12th fail’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचला. ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाद्वारे विक्रांत पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय ‘सेक्टर ३६’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटांमध्ये विक्रांत पाहायला मिळणार आहे.