Vikrant Masseys video goes viral: नुकताच ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानपासून ते मोहनलाल या सर्वांचा गौरव करण्यात आला.

शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांचा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी या कलाकारांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. विक्रांत मेस्सीला ‘१२वी फेल’साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, त्याची प्रमुख भूमिका असलेल्या आणि विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१२वी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

आता पुरस्कार मिळाल्यानंतर विक्रांतवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. इन्स्टंट बॉलीवूडने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की विक्रांत त्याची पत्नी व कुटुंबीयांसह येतो, तिथे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येतो. त्या ठिकाणी जमलेले सर्वजण त्याला शुभेच्छा देतात. विक्रांतदेखील सर्वांचे आभार मानत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विक्रांतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “त्याचा अभिनय खूप चांगला आहे”, “आज तो खरंच आयपीएस बनला”, “तुझ्या नवीन चित्रपटाची वाट पाहत आहे”, “तुझे खूप अभिनंदन”, “इंडस्ट्रीत एन्ट्री केल्यानंतर कमी काळात या व्यक्तीने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला”, “तो या पुरस्कारासाठी पात्र आहे”, “तो इतका चांगला अभिनेता आहे की, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

विक्रांतला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या पत्नीने एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने त्याचा अभिमान वाटत असल्याचे लिहिले आहे; तर विक्रांतनेदेखील दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत त्याची पत्नी व तो पुरस्कार पाहत असल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये विक्रांत त्यांच्या पुरस्कार मेडलसह दिसत आहे. हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, मी कालपासून विचार करत आहे की मी काय लिहू? तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू? पण, आताही मला काही सुचत नाही. पुढे त्याने लिहिले की मला मनापासून सर्वांना थँक्यू म्हणायचे आहे. तुम्ही माझ्या प्रवासात ज्या पद्धतीने पाठिंबा दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओमध्ये शाहरुख, राणी आणि विक्रांत कौतुकाने मेडल गळ्यात घालत असल्याचे पाहायला मिळाले, तर शाहरुखने इतर पुरस्कारप्राप्त कलाकारांची भेट घेतल्याचेदेखील दिसले. आता आगामी काळात हे कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.