Vipul Shah on Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्याने खिलाडी कुमार म्हणून ओळख मिळवली.
त्याचे ‘ऐतराज’, ‘हाँ मैंने भी प्यार किया है’, ‘जानवर’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘संघर्ष’, ‘सबसे बडा खिलाडी’, असे अनेक चित्रपट गाजले. विशेष बाब म्हणजे त्याने नायक, गंभीर, विनोदी अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या.
गेल्या ३८ वर्षांपासून अक्षय कुमार अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. मात्र, अनेकदा त्याच्या अभिनयाचे पुरेसे कौतुक केले जात नाही. त्याला त्याच्या कामाचे श्रेय दिले जात नाही, असे वक्तव्य चित्रपट निर्माते, दिग्दर्शक विपुल शाह यांनी केले आहे. त्यांनी आतापर्यंत सात चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि त्यातील चार चित्रपटांत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत होता.
“त्याच्याकडे देण्यासारखं खूप काही…”
विपुल शाह यांनी नुकतीच ‘गल्लाटा इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षय कुमारबद्दल ते म्हणाले, “जेव्हा मी माझ्या पहिल्या दोन चित्रपटांत अक्षयबरोबर काम करीत होतो, त्यावेळी मला जाणवले की, हा असा अभिनेता आहे, जो स्वत:च्या क्षमतांबाबत अनभिज्ञ आहे. तो काय करू शकतो, याची त्याला जाणीव नाही.”
शाह पुढे म्हणाले, “त्याला अॅक्शन हीरोचं लेबल लावलं गेलं. त्यानंतर त्यानं विनोदी चित्रपटांत काम करीत त्याची ही प्रतिमा पुसून काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याला कधीच कोणी फार गांभीर्यानं घेतलं नाही. कदाचित त्याला कधीही कोणत्याही समीक्षकानं एक उत्तम अभिनेता किंवा एक चांगला अभिनेता म्हणून मानलं नव्हतं. त्यामुळे अक्षय कुमारचादेखील मला काही फरक पडत नाही, असा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण, मला वाटतं की, त्याच्याकडे देण्यासारखं खूप काही आहे.”
विपुल शाह असेही म्हणाले की, अक्षय कुमार गोष्टींकडे खूप विचारपूर्वक पाहतो, हे त्याच्याबरोबर काम केल्यावर जाणवतं. पण, लोक त्याला दुरून पाहतात आणि जज करतात. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकाराबरोबर काम करता, त्यावेळी तुम्हाला त्या कलाकाराला जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. एखाद्या सीनकडे ते कसे पाहतात. सहजपणे ते त्यांच्या पात्रात कसे बदल करू शकतात, हे बारकाईनं पाहायला मिळतं. उदाहरणार्थ, जर काल आपण एखादा कॉमेडी सीन करीत असू आणि आज एखादा गंभीर, थ्रिलर सीन शूट करत असू, तर तो ते सीन सहजपणे करतो. काल काय केलं, याचं दडपण त्याच्यावर नसतं, तो त्या पात्राला न्याय देतो.
“मी त्याच्याबरोबर ज्या चित्रपटांत काम केले,ते दोन्ही चित्रपट, त्यातील भूमिका एकमेकांपासून भिन्न होत्या. पण, त्यानं ती पात्रं सहजपणे साकारली. पण, कोणीही त्याला त्याच्या कामाचं श्रेय दिलं नाही. त्यानंतर मला जाणीव झाली की, त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये कोणीही त्याला पंजाबी मुलाची भूमिका दिली नाही. तो पूर्णत: पंजाबी आहे. पण, कोणीही त्याला त्या प्रकारे पडद्यावर दाखवलं नाही. नमस्ते लंडन या चित्रपटातील त्याला जी भूमिका मिळाली, ती त्याच्यासाठीच होती. पंजाबी मुलगा, ज्याला मजा-मस्ती करणं आवडतं. त्यानं ते पात्र खूप सहजपणे साकारलं. कारण- तो मुळात तसा आहे.”
याच मुलाखतीत विपुल शाह असेही म्हणाले, “अक्षय कुमारनं स्वत:ला अनेकदा सिद्ध केलं आहे. त्याला सतत अपयशाला सामोरं जावं लागत होतं. तरीही त्यानं प्रयत्न केले. ‘केसरी २’ला मिळालेल्या यशाद्वारे टीका करणाऱ्यांना त्यानं शांत केलं आहे.” दरम्यान, अक्षय कुमार नुकताच हाऊसफुल ५ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, लवकरच अभिनेता वेलकम टू द जंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.