विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांकडे अलीकडची तरुणाई ‘कपल गोल्स’ म्हणून पाहते. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांचे चाहते प्रेमाने त्यांना ‘विरुष्का’ म्हणतात. विराटने काही दिवसांपूर्वीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले होते.

सध्या IPL सुरू असल्याने विराटच्या चाहत्यांनी त्याला टेस्ट क्रिकेटमधून फेअरवेल देण्यासाठी व्हाइट जर्सी घालून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मात्र, १७ मे रोजी हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पुढील सामना शुक्रवार २३ मे रोजी होणार आहे. यावेळी RCB समोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असेल.

विराट कोहलीबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अशातच आरसीबीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून एक खास फोटो अन् व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहून विरुष्काचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत.

विराटच्या अनेक मॅच पाहण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित असते. मात्र, यंदाच्या आयपीएल सीझनच्या आतापर्यंत झालेल्या मॅचला अनुष्का स्टेडियममध्ये आलेली नव्हती. अखेर RCB च्या टीमकडून या दोघांचा एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनुष्का RCB कॅप्ममध्ये सहभागी झाली असून, विराट-अनुष्का एकाच टीममध्ये पिकलबॉल खेळत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

RCB ने शेअर केलेल्या फोटोंमध्ये विराट-अनुष्कासह दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी दीपिका यांचीही झलक पाहायला मिळत आहे. आरसीबीच्या ताफ्यातील गोलंदाज भुवनेश्वर कुमार सुद्धा पिकलबॉल खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. आरसीबीचे कोच, टीममधील अन्य खेळाडू सुद्धा यावेळी उपस्थित होते.

नेटकऱ्यांनी विराट-अनुष्काच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अखेर वहिनी आल्याच…”, “आता वहिनी पुढच्या नक्की मॅचला येणार”, “अनुष्का-विराट म्हणजेच किंग अँड क्वीन”, “DK अँड VK कुटुंबीय”, “आता अनुष्का पुढील मॅचसाठी आली पाहिजे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.