Vivek Oberoi Childhood Love: विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. विवेक व ऐश्वर्या नंतर वेगळे झाले, पण विवेकचं करिअर सलमानमुळे उद्धवस्त झाले. ऐश्वर्या व विवेकच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, पण तिच्याआधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती. विवेकने अवघ्या १७ व्या वर्षी त्याच्या बालपणीच्या प्रेयसीला कर्करोगामुळे गमावलं. तिच्या जाण्यानंतर विवेकला खूप भावनिक संघर्ष करावा लागला होता.

विवेक म्हणाला, “माझी बालपणीची प्रेयसी—ती १२ वर्षांची, मी १३ वर्षांचा होतो आणि आम्ही डेटिंग करत होतो. मी १८ वर्षांचा व ती १७ वर्षांची झाल्यावर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. मला वाटलं, ‘आता जे आहे ते हीच आहे.’ आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. लग्न आणि मुलांबद्दलही आम्ही बोलायचो. माझं तिच्याबरोबरचं आयुष्य कसं असेल याची कल्पना मी माझ्या मनात केली होती,” असं विवेकने MensXP ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

५-६ वर्षांचं होतं दोघांचं नातं

“मी तिला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण ती काही उत्तर देत नव्हती. तिने आधी सांगितलं होतं की तिला बरं वाटत नाही आणि मला वाटलं की तिला फक्त सर्दी झाली आहे. पण मी तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकलो नाही; त्यानंतर मी तिच्या चुलत बहिणीला कॉल केला. तिने सांगितलं की ती हॉस्पिटलमध्ये आहे. मी हॉस्पिटलला पोहोचलो. आम्ही ५-६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. अचानक मला कळलं की ती लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यानंतर दोन महिन्यांतच तिचे निधन झाले. मी तिच्या मृत्यूने हादरलो होतो,” असं विवेक ओबेरॉय म्हणाला.

ती गेली हे मान्य करायला तयार नव्हतो – विवेक ओबेरॉय

विवेक पुढे म्हणाला, “तिच्या निधनाचा माझ्यावर इतका खोलवर परिणाम झाला की, बरेचदा इतरांमध्ये मला ती दिसायची. मी तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिथं होतो, जे घडलं ते डोळ्यांसमोर होतं; पण तरीही ती गेली हे मान्य करायला मी तयारच नव्हतो. या अनुभवामुळे कॅन्सरशी झुंज देत असलेल्या मुलांबरोबर काम करताना मला मदत झाली.” कमी वयातच विवेकने प्रेयसीला गमावलं. या घटनेचा त्याला खूप धक्का बसला. तसेच या अनुभवाने आयुष्य आणि नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन बदलला. तेव्हापासून आपल्या जवळच्या लोकांबरोबर प्रत्येक क्षण जगायचं ठरवलं, असं विवेक सांगतो.

विवेक नंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीत आला. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच तो ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्याच्या करिअरला फटका बसला. नंतर काही वर्षांनी विवेक ओबेरॉयने २०१० मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. विवेक आता कुटुंबाबरोबर दुबईमध्ये राहतो.