Vivek Oberoi Opens Up About Personal Struggles : बॉलीवूड अभिनेता सलमान खान म्हटलं की त्याच्या ग्लॅमरसह त्याच्या संबंधित अनेक वादही समोर येताना दिसतात. ऐश्वर्या आणि सलमान खानच्या प्रेमाची जेवढी चर्चा होती, त्याबरोबरच विवेक ओबेरॉय आणि सलमानाच्या वादाचीदेखील तेवढीच चर्चा होताना दिसते.

विवेकने वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या वाईट काळ पाहिला आहे. तो आता भूतकाळ विसरून पुढे सरकला आहे. मात्र, त्याला अनेकदा मुलाखतीमध्ये भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले जातात, ज्यावर तो मोकळेपेणाने आपलं मत व्यक्त करत असतो. अशातच अलीकडील एका मुलाखतीत विवेकने पुन्हा त्या काळातील प्रसंगांबद्दल त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रखर गुप्ता यांच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत विवेक म्हणाला, “आता मागे वळून पाहिलं की सगळं हास्यास्पद वाटतं. माझ्याबरोबर नेमकं काय झालं, याबद्दल माझ्या मनात आता फारसा राग नाही. पण, माझ्या आईच्या डोळ्यातील अश्रू आणि वडिलांचा चेहरा हे विसरणं कठीण आहे. त्याचा आजही त्रास होतो. पण, हळूहळू त्या गोष्टीही सोडून द्यायच्या असतात, कारण अशा आठवणींमुळे मनात नकारात्मक भावना निर्माण होतात.”

“चित्रपटातून काढलं, धमक्या मिळाल्या” : विवेक ओबेरॉय

पुढे विवेकने सांगितलं की, त्याने साइन केलेल्या अनेक चित्रपटांतून त्याला काढून टाकण्यात आलं. कोणीही माझ्याबरोबर काम करायला तयार नव्हतं. त्या काळात अशी वेळ आली होती की, सगळे मला बहिष्कृत (बॉयकॉट) करत होते. माझ्या हातातून एकामागून एक असे अनेक चित्रपट गेले. इतकंच नाही तर मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकीचे फोन येऊ लागले. माझी बहीण, आई, वडील सगळ्यांना धमक्या दिल्या गेल्या.”

“वैयक्तिक आयुष्यही विस्कळीत झालं” : विवेक ओबेरॉय

विवेकने जरी ऐश्वर्याबरोबरच्या ब्रेकअपविषयी थेट काही म्हटलं नसलं, तरी त्याने स्पष्ट केलं की त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही या सगळ्याचा परिणाम झाला. विवेक म्हणाला, “त्या काळात माझं खासगी आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. मी नैराश्यात गेलो होतो. ‘हे सगळं माझ्याच बाबतीत का घडलं?’ असं म्हणत स्वत:ला सतत कोसत राहिलो.”

दरम्यान, आज विवेक ओबेरॉय एक यशस्वी उद्योजक आहे. शिवाय चित्रपटसृष्टीतही त्याने काम सुरू ठेवलंय. अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच तो ‘मस्ती ४’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात विवेक ओबेरॉयसह रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विवेक, रितेश आणि आफताब या कलाकारांव्यतिरिक्त, ‘मस्ती ४’च्या कलाकारांमध्ये रुही सिंग, एलनाज नैरोझी आणि ‘बिग बॉस १९’मधील स्पर्धक नतालिया जानोस्झेकसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.