Vivek Oberoi Talks About His Business Mantra : विवेक ओबेरॉय हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, विवेक फक्त अभिनेता नसून एक यशस्वी उद्योजकसुद्धा आहे. अशातच त्याने नुकतंच त्याच्या बिझनेसबद्दल सांगितलं आहे.

विवेकने वर्षानुवर्षे रिअल इस्टेट, एज्यु-टेक, दागिने, अ‍ॅग्रो-टेक, फिनटेक आणि इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक करून, आता त्याची एकूण संपत्ती सुमारे १२०० कोटी इतकी आहे. तो बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक मानला जातो. त्याने नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने तो त्याचा व्यवसाय कसा सांभाळतो याबद्दल सांगितलं आहे.

व्यवसाय वाढवण्याबद्दल तो म्हणाला, “जेव्हा मला समजलं की, पैसे कसे कमवायचे, तेव्हा मी त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करत राहिलो. यादरम्यान अनेक चढउतार आले.” विवेकने सांगितलं की, त्याच्या कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या पानवाल्यांकडून तो स्टॉक मार्केटबद्दल सल्ले घ्ययाचा. तो पुढे म्हणाला, “मी तिथल्या डोसा, चहा आणि पान-बिडी सारख्या विक्रेत्यांना आर्थिक मदत करत होतो.”

विवेकने सांगितले की, तो तरुण असताना त्याने शेअर बाजाराचं प्रशिक्षण घेतलं आणि एका ब्रोकरकडून ट्रेडिंग आणि बाजारातील वेगवेगळ्या पैलूंविषयी गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी त्याने तो जेव्हा अभिनयाकडे वळला, तेव्हा त्याचं व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष झालं, कारण तो फक्त कुठल्यातरी उद्घाटनाला आणि लग्नांना जाऊन यातून पैसे कमवत होता.असं सांगितलं.

विवेकने सांगितलं की, त्याला कधीच पैशांची कमतरता जाणवली नाही आणि पैसे कमी होण्याची भीतीही वाटली नाही, कारण तो नेहमी गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यायचा. विवेक याबद्दल म्हणाला, “जेव्हा मी १७-१८ वर्षांचा होतो, तेव्हा मला मी काहीतरी खूप मोठं करणार आहे असं वाटलेलं. त्यावेळी मी कुठलाही विचार न करता एक मोठा निर्णय घेतलेला आणि माझं खूप मोठं नुकसान झालं होतं, जे कमवायला मला दोन ते अडीच वर्ष गेले होते. पण, त्यातून मला मोठा अनुभव मिळाला.”

विवेकला तो पूर्णपणे व्यवसायाकडे का वळला याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी खूप निराश झालो होतो, कारण मला आयुष्यात खूप काही करायचं होतं. पण, मला नेहमी खाली खेचलं जायचं. जेव्हा मी दोन पावले पुढे जायचा प्रयत्न केला, तेव्हा मला चार पावलं मागे खेचलं जात होतं. माझ्याकडे दोन पर्याय होते”.

विवेकचा बिझनेस मंत्र

गुंतवणूक करण्याबद्दल विवेक म्हणाला, “मी वन नाइट स्टँडमध्ये विश्वास ठेवत नाही, तर माझा लग्नावर विश्वास आहे. मला श्रीमंत व्हायचं आहे, फक्त पैसा नाही कमवायचाय. जर रिअल इस्टेटबाबत बोलायचं झालं, तर मी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या जमिनीबद्दल शिकलो. त्यांच्या घरी बसून जमिनीचा नीट अभ्यास केला आणि त्यांच्या मूलभूत गोष्टी समजून घेतल्या; त्यामुळे मला असं स्थान मिळालं, जिथे मी हळूहळू पण नक्की यशस्वी होऊ शकलो.”