Madhuri Dixit & Anil Kapoor : ‘तेजाब’ सिनेमामुळे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. याशिवाय मोहिनी आणि मुन्नाची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. ‘तेजाब’च्या यशानंतर माधुरी व अनिल कपूर यांची जोडी अनेक सिनेमांमध्ये एकत्र पाहायला मिळाली.

‘बेटा’, ‘राम लखन’, ‘खेल’, ‘राजकुमार’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये माधुरी व अनिल कपूर यांनी एकत्र काम केलेलं आहे. आता एवढी वर्षे एकत्र काम केल्यावर या दोन्ही कलाकारांना एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी माहिती आहेत. काही वर्षांपूर्वी या दोघांनीही कपिल शर्माच्या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी कपिलने त्यांना “एकमेकांबद्दलच्या अशा काही गोष्टी सांगा…ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीयेत” असा प्रश्न विचारला होता. यानंतर सर्वात आधी माधुरीने अनिल कपूर यांच्याबद्दलचा लंच टाईममधील किस्सा सर्वांना सांगितला.

कपिलच्या प्रश्नावर उत्तर देताना माधुरी दीक्षित म्हणते, “सेटवर लंच टाईम होतो तेव्हा अनिलजी कधीच स्वत:च्या ताटात जे वाढलंय ते जेवत नाहीत. ते सगळ्यांकडे जातात आणि कोणी काय-काय आणलंय ते पाहतात. सगळ्यांनी आणलेले पदार्थ टेस्ट करून पाहतात. आता समजा सगळे एकत्र जेवायला बसलेत आणि अनिल कपूर आले…तर ते विचारणार अरे? हे काय आणलंय वडा आहे? मस्त वाटतोय… थांबा! मी चव घेऊन बघतो. असं करत सगळ्यांनी आणलेले पदार्थ ते टेस्ट करून पाहतात.”

यानंतर अनिल कपूर यांनी देखील माधुरीची देखील पोलखोल केली आहे. ते म्हणतात, “आता मी माधुरीबद्दल काहीतरी सांगू का? ती खाण्याची प्रचंड शौकीन आहे. तिला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. ती सेटवर कधीच कोणावर नाराज नसते, कधीच कोणावर चिडत नाही आणि सहसा ती कोणावर रागवत सुद्धा नाही. पण, जर तुम्ही तिला वेळेवर जेवण दिलं नाही, लंच ब्रेकला वेळ झाला तर मात्र, ती प्रचंड भडकते. ‘खाना कहा है’ (अनिल कपूर माधुरीची मिश्किलपणे अ‍ॅक्टिंग करतात ) असं म्हणते.”

यानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये एकच हशा पिकला होता. अनिल कपूर यांचं बोलणं ऐकल्यावर अगदी माधुरी स्वत: सुद्धा दिलखुलासपणे हसत होती. दरम्यान, माधुरी आणि अनिल कपूर यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टोटल धमाल’ या सिनेमात सुद्धा एकत्र काम केलं होतं. यांच्या जोडीची लोकप्रियता आजही कायम आहे.