सध्या बरेचसे बॉलिवूड कलाकार हॉलिवूडमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. नुकतंच आलिया भट्ट, वरुण धवनसारखे कलाकार येत्या काळात हॉलिवूड प्रोजेक्टमधून समोर येणार आहेत. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिने तर केंव्हाच हॉलिवूडमध्ये बस्तान मांडलं आहे. एकूणच सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इतर सुविधांमुळे हॉलिवूडमध्ये ओळख मिळवणं तितकं अवघड राहिलेलं नाही. पण तुम्हाला माहितीये का खुद्द ऐश्वर्या रायलासुद्धा हॉलिवूडची एक मोठी ऑफर आली होती.

या सगळ्या अभिनेत्रींच्याही आधी ऐश्वर्या रायलादेखील हॉलिवूड मधून विचारणा झाली होती. पीअर्स ब्रोसनन या हॉलिवूड स्टारच्या लोकप्रिय बॉन्डपटासाठी ऐश्वर्याचा विचार सुरू होता. जेम्स बॉन्डच्या चित्रपटातील बॉन्ड गर्ल म्हणून ऐश्वर्या रायला घ्यायचा विचार तेव्हा सुरू होता. पण ऐश्वर्याचं हे स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही.

आणखी वाचा : शाहरुखचा ‘पठाण’ घेणार चिन्मय मांडलेकरच्या ‘नथुराम’शी टक्कर; बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार एक वेगळं युद्ध

‘पिंक पॅंथर २’, ‘द लास्ट लीगन’ अशा काही हॉलिवूडच्या चित्रपटात ऐश्वर्या झळकली मात्र बॉन्डपटात काम मिळायचं राहिलं ते राहिलंच. ‘गार्डीयन’शी संवाद साधताना ऐश्वर्याच्या तेव्हाच्या सेक्रेटरीने याबद्दल खुलासा केला. ऐश्वर्याचे सेक्रेटरी हरी सिंग म्हणाले, “बॉन्डसारखे चित्रपट निर्माण करणारे स्टुडिओ जेव्हा आमच्याकडे ऐश्वर्यासाठी विचारणा करायला आले तेव्हा आमचा कुणाचाच त्यावर विश्वास बसेना.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या तेव्हा अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्याबरोबर ‘खाकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. याबद्दल पुढे हरी सिंग म्हणाले, “त्या स्टुडिओची मंडळी खाकीच्या सेटवर यायचे, ऐश्वर्याची तयारी बघायचे. ऐश्वर्याला बॉन्डपटात घेण्यासाठी ते प्रचंड उत्सुक होते.” नंतर डेट्सची समस्या न सुटल्याने ऐश्वर्याच्या हातून ही संधी निसटली. असं म्हंटलं जातं की, ऐश्वर्याबरोबरच तेव्हा बॉन्डपटासाठी प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, प्रीती झिंटा यांनादेखील विचारण्यात आलं होतं.