बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या व आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रेखा त्यांच्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांनी स्वतःबद्दल लोकांचं मत काय आहे, हे सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती.
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना एकाच वेळी डबल शिफ्टमध्ये तब्बल २५ चित्रपटांमध्ये काम करत होत्या. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकात रेखा यांच्या एका वक्तव्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलंय की, रेखा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, “तुम्ही एका पुरुषाच्या तोपर्यंत जवळ जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर सेक्स करत नाही.” रेखा यांचं हे वक्तव्य एवढं गाजलं होतं की त्या सेक्ससाठी वेड्या आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती.
एकेकाळी रेखा आणि जितेंद्र यांच्या रोमान्सची खूप चर्चा झाली होती. ‘एक बेचारा’ चित्रपटात अभिनेते जितेंद्र व रेखा मुख्य भूमिकेत होते. याचबरोबर ते रेखा यांच्याबरोबर काम करणारे पहिले ए-लिस्ट अभिनेते होते. त्याआधी रेखा यांनी फक्त बी-लिस्ट कलाकारांबरोबर काम केलं होतं. त्यावेळी चाहत्यांबरोबरच अभिनेत्रींमध्येही जितेंद्र यांच्याबद्दल एक वेगळीच क्रेझ होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा- जितेंद्र यांच्यात जवळीक वाढली.
रेखा व जितेंद्र यांच्या रोमान्सच्या चर्चा
शिमल्यात शूटिंग सुरू असतानाच रेखा आणि जितेंद्र यांच्या रोमान्सचे किस्से चर्चेत होते. जितेंद्र यांनीच रेखा यांच्याशी जवळीक वाढवल्याचंही बोललं जात होतं. जितेंद्र यांच्याशी नाव जोडलं गेल्यावर लोक रेखाशी व्यवस्थित बोलू लागले होते. जितेंद्र यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर रेखा यांना पहिल्यांदाच प्रेम आणि आदर याची जाणीव झाली. जितेंद्र यांना पाहिल्यानंतर रेखा यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत असे. त्या काळात खरं तर सगळे कलाकार आपलं खासगी आयुष्य गुप्त ठेवण्यावर भर द्यायचे अशा वेळी रेखा तर जितेंद्र यांच्याशी त्यांच्या अफेअरबद्दल बिनधास्त बोलू लागल्या होत्या, असं यासिर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

जितेंद्र यांच्या गर्लफ्रेंडची एंट्री अन् रेखा…
रेखा शूटिंगच्या बाबतीत बेजबाबदार वागायच्या आणि त्यांना अजिबात शिस्त नव्हती, असं तेव्हा त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं. त्यातच प्रेमात पडलेल्या रेखाबरोबर काम करणं सर्वांना फार कठीण जात होतं. जितेंद्र व रेखा यांना ‘अनोखी अदा’साठी घेतल्यावर त्यांच्या लव्ह लाइफमध्ये एक ट्विस्ट आला. तो म्हणजे जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा. एअर होस्टेस शोभा जितेंद्र यांना आवडायच्या. पुढे जितेंद्र व रेखा यांच्यात भांडणं होऊ लागली. जितेंद्रबरोबरचं नातं गंभीर नाही, फक्त टाइमपास आहे अशी जाणीव नंतर रेखा यांना झाली.
रेखा-जितेंद्रचे भांडण
दोघांच्या नात्यात दुरावा आला. एकदा तर ‘अनोखी अदा’च्या सेटवरच रेखा व जितेंद्र यांचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर ज्युनियर कलाकारांच्या समोर जितेंद्र यांनी रेखा यांच्याबद्दल ‘टाइमपास’ सारखे शब्द वापरले होते. ज्यामुळे रेखा मेकअप रुममध्ये जाऊन ढसाढसा रडल्या होत्या. दोघांमधील प्रेम संपलं, त्यामुळे त्यांचे रोमँटिक सीन्स शूट करणंही कठीण झालं होतं. कसंबसं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. पॅकअप झाल्यानंतर दोघेही एकमेकांना ओळखत नसल्यासारखे निघून जायचे.
यासिर उस्मान यांच्या पुस्तकात एका मुलाखतीचा उल्लेख आहे. ही मुलाखत रेखा यांनी जितेंद्र यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर आपलं दुःख व्यक्त केलं होतं. “मी त्या माणसाचा तिरस्कार करते. त्याने प्रेम, रोमान्स आणि लग्नाबाबत बालपणापासून जे आदर्श होते ते सगळे आदर्श उद्धस्त केले. मी फक्त एक अभिनेत्री नाही तर बदनाम अभिनेत्री आहे. माझा भूतकाळ खूपच वाईट आहे आणि मी सेक्ससाठी वेडी आहे असं माझ्याबद्दल बोललं जातं,” असं रेखा या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.