Shammi Kapoor And Mumtaz Relationship: बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या लव्ह स्टोरीची मोठी चर्चा झाली. अनेक दिग्गज कलाकारांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलले जाते.

अशाच काही प्रेमकहाण्यांपैकी दिग्गज अभिनेत्री मुमताज आणि दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांची प्रेमकहाणी आहे. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात शम्मी कपूर व मुमताज प्रमुख भूमिकांत होते. यावेळी त्यांच्या नात्याची मोठी चर्चा झाली. काही काळानंतर या कलाकारांनीदेखील त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते.

शम्मी कपूर काय म्हणालेले?

‘लेहेरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते शम्मी कपूर यांनी मुमताज यांच्याबरोबर ब्रह्मचारी चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला होता. अभिनेते म्हणालेले, “त्या काळात माझी पहिली पत्नी वारली होती. चित्रपटाच्या निमित्तानं मी मुमताजला भेटलो. ती खूप सुंदर होती. काही काळासाठी आम्ही दोघांनी भविष्याची स्वप्नं पाहिली; पण ते आमच्यासाठी वाईट स्वप्न, दु:स्वप्न ठरलं. पण, जे झालं ते योग्य झालं. मी आज आनंदी आहे.”

शम्मी कपूर यांचा गीता बाली यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, त्यांचा १९६५ ला मृत्यू झाला.

रेडिफला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, मुमताज यांनी शम्मी कपूर यांना प्रपोज केल्याचं कबूल केले होते. त्यावेळी त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. मात्र, त्यांनी या प्रपोजलला नकार दिला होता. त्याचं कारणही त्यांनी उघड केलं होतं. मुमताज म्हणालेल्या, ” मी अभिनय क्षेत्र सोडावं, असं त्यांना वाटत होतं. मी त्यावेळी फक्त १७ वर्षांची होते. त्यांनी माझ्यावर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम माझ्यावर कोणी केलं, असं मला वाटत नाही.”

“मी त्यांना कधीही विसरू शकले नाही. आजही जेव्हा त्यांचं नाव घेतलं जातं, त्यावेळी माझ्या डोळ्यांत अश्रू येतात. ते फक्त अफेअर नव्हतं, त्यापेक्षा खूप काही होतं. आम्ही एकमेकांवर खूप मनापासून प्रेम केलं.”

शम्मी कपूर यांनी अभिनय क्षेत्र सोडायला सांगितल्यानंतर त्यांनी तो निर्णय का घेतला नाही, याचे कारण मुमताज यांनी सांगितले होते. त्या म्हणालेल्या, “मी ज्या क्षेत्रात काम करीत होते, त्यातून मला उत्पन्न मिळत होते. मला माझ्या कुटुंबाला मदत करायची होती. दुर्दैवानं त्यावेळी कपूर कुटुंबातील स्त्रिया काम करीत नसत. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेचा आदर ठेवावा लागला. मला माझ्या कामाचा आदर ठेवावा लागला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी करिअरमध्ये संघर्ष करीत होते, पण त्यावेळी मला आठ लाख मानधन मिळत असे. मी त्या काळातील सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. मी लहान होते, त्यावेळी माझी आई मला विचारायची की, तू मोठी झाल्यावर कोणाशी लग्न करशील? त्यावर मी तिला सांगायचे की, मी इराणच्या शहेनशाहाशी लग्न करेन. मला माझ्या आयुष्यात सर्वोत्तम गोष्टी पाहिजे होत्या.”

दरम्यान, जेव्हा शम्मी कपूर व मुमताज यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्याशी लग्नगाठ बांधली; तर मुमताज यांनी उद्योगपती मयूर माधवानी यांच्याशी लग्न केले.