बॉलीवूडमध्ये दरवर्षी बरेच नवीन कलाकार पदार्पण करतात. त्यापैकी काही यश मिळवून वर्षानुवर्षे चित्रपटसृष्टीत टिकून राहतात. तर काही मात्र अपयश, वाईट अनुभव किंवा इतर कारणांनी इंडस्ट्री सोडून वेगळ्या क्षेत्रात करिअर करतात. फिल्म इंडस्ट्रीत आधीच लोकप्रिय झालेल्या कलाकारांसारखे दिसणारेही काही कलाकार आले, ज्यांना प्रसिद्धी मिळाली. झरीन खान कतरिना कैफसारखी दिसते, स्नेहा उल्लाल ऐश्वर्या रायसारखी दिसते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ९० च्या दशकातील एक अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी दिसायची.
या अभिनेत्रीचं नाव निक्की अनेजा, जी पुढे निक्की वालिया झाली. निक्कीला ‘छोटी माधुरी’ देखील म्हटलं जायचं. जवळपास २५ वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली निक्की वालिया आता कुठे आहे आणि ती काय करतेय तसेच तिने इंडस्ट्री का सोडली होती, हेही जाणून घेऊयात.
निक्की अनेजा वालिया ही एकेकाळी एक प्रसिद्ध मॉडेल आणि जाहिरात विश्वातील लोकप्रिय चेहरा होती. तिने अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केलं होतं. एका जाहिरातीच्या ऑडिशन दरम्यान, मुकुल आनंद यांनी तिला एक सल्ला दिला होता. “निक्की, तू खूप इम्प्रेसिव्ह आहेस. तू उत्पादनं नाही, तर अभिनय विक,” असं मुकुल म्हणाले होते. या सल्ल्यानंतर निक्कीने अभिनय करायचं ठरवलं.
निक्कीचे पदार्पण व चित्रपट
निक्कीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिस्टर आझाद’ या चित्रपटातून केली. हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तिला शाहरुख खानच्या ‘येस बॉस’ची ऑफर आली. निक्कीने आधीच पाच दिवसांचे शूटिंग केले होते, पण तिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिने तिची फी परत देऊन चित्रपट सोडला.
निक्कीने ‘शानदार,’ ‘लुप्त,’ ‘अपराधी,’ ‘तारा व्हर्सेस बिलाल,’ ‘नियत,’ आणि ‘व्हर्जिन भानुप्रिया’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. आहे. १९९० च्या दशकात करिअरची सुरुवात करणारी निक्की टेलिव्हिजन विश्वातही सक्रिय आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
निक्की अनेजा वालिया व अर्चना पूरन सिंहचं नातं
निक्की अनेजा वालिया ही परमीत सेठीची बहीण आणि अर्चना पूरन सिंगची नणंद आहे. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना निक्कीने काही खुलासे केले. चित्रपटांमध्ये काम करताना तिला जाणवलं की महिलांना इंडस्ट्रीमध्ये फक्त वस्तू म्हणून पाहिलं जातं. यामुळे तिला खूप वाईट वाटलं. तिला एकदा चित्रपटाच्या सेटवर वितरकांबरोबर डिनर करण्यास सांगितलं होतं. तिने आक्षेप घेतल्यावर “चित्रपट विकायचा नाहीये का?” असं निर्मात्यांनी म्हटलं होतं. हे ऐकल्यानंतर निक्कीने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली निक्की
निक्की १९९९ नंतर चित्रपटांपासून दूर गेली. पण तिने टीव्हीवर काम केलं. २००२ मध्ये निक्की अनेजाने उद्योगपती सोनी वालियाशी लग्न केलं आणि ती यूकेला कायमची निघून गेली. तिला दोन जुळी अपत्ये झाली. बऱ्याच वर्षांनी २०१७ मध्ये, निक्की वालिया तिच्या ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेमुळे खूप चर्चेत होती. या मालिकेत स्मृती कालरा, आशिम गुलाटी आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते आणि निक्कीने स्मृती कालराच्या आईची भूमिका साकारली होती.
