‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आमिर खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं, तेव्हापासूनच आमिर लाईमलाइटपासून दूर झाला.

इतकंच नव्हे तर आता निर्मितीवर लक्षकेंद्रित करायचं आमिर खानने स्पष्ट केलं होतं. यानंतर काहीच दिवसांनी आमिर खान लवकरच कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरू झाली. ‘पिंकव्हीला’च्या एका रिपोर्टनुसार आमिर खान लवकरच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली. दिनेश विजन हे या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचंही समोर आलं.

आणखी वाचा : कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा

‘पाताल लोक’सारखी सीरिज आणि ‘किल्ला’सारखा चित्रपट दिग्दर्शित करणारे अविनाश अरुण यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना अविनाश म्हणाले, “मला ठाऊक नाही की ही बातमी बाहेर कशी आली पण अद्याप काहीही ठोस गोष्ट आमच्या हातात नाहीये. अजूनही सगळं प्राथमिक स्तरावरच आहे. या सगळ्यावर चर्चा सुरू आहे, त्यामुळे आत्ता जे काही तुमच्यापर्यंत पोहोचतय त्या सगळ्या सांगीवांगी बातम्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर नेमका हा चित्रपट करणार का? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यायचं टाळलं. या सगळ्या हवेतल्या बाता असल्याचं सांगत या विषयाला बगल दिली. उज्वल निकम यांनी १९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २६- ११ दहशतवादी हल्ला, शक्तीमिल बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार अशा अनेक विविध प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यामुळे आमिर जर खरंच यात मुख्य भूमिका साकारणार असेल तर ही त्याच्या चाहत्यांसाठी फार आनंदाची गोष्ट असेल.