Yograj Singh begs forgiveness of son Yuvraj Singh and ex wife: अभिनेते व माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांना आयुष्यात कोणताही पश्चात्ताप नाही. तसेच ते फक्त आईच्या निधनानंतर रडले असल्याचे वक्तव्य केले होते.
आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. योगराज म्हणाले होते की, जेव्हा ते युवराजला क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीवर कडक निर्बंध लादले होते. आता त्यासाठी त्यांनी युवराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची माफी मागितली.
“ते माझ्या कुटुंबातील…”
योगराज सिंग यांनी नुकतीच ‘फाइव्हवूड पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. ते म्हणाले, “मी काही महिन्यांपूर्वी मृत्यूचा जवळून अनुभव घेतला. त्यातून मी वाचलो हा चमत्कार आहे. माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करावी लागेल, तसेच, त्यातून वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. त्या अनुभवामुळे माझ्यात काहीतरी बदल झाला.”
त्यांना विचारण्यात आले की, त्यांना त्यांच्या आयुष्यात काही पश्चाताप झाला आहे का? त्यावर योगराज सिंग यांनी, “मला खूप जास्त पश्चात्ताप आहे. मी जे काही केले ते माझ्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केले. त्यातील काही आठवणी मी पुसून टाकल्या आहेत. कारण- त्या माझ्या गुरूंनी करण्यास सांगितल्या होत्या. पण, मी हात जोडून माफी मागतो. ज्यांना कोणाला माझ्यामुळे त्रास झाला आहे, मग ते माझ्या कुटुंबातील असतील किंवा बाहेरचे असतील, त्यांची मी माफी मागतो. मी माझ्या मुलांची, पत्नीची, युवराजच्या आईची माफी मागतो.”
“मी सगळ्यांची माफी मागतो. ती सगळी माझी चूक होती. जर मी माझ्या क्रिकेट किंवा चित्रपटसृष्टीतील मित्रांबद्दल चुकीचे बोललो असेन, तर मी माफी मागतो. माझ्यात कोणतेही चांगले गुण नाहीत. माझ्यात फक्त वाईट गोष्टी आहेत. मी माझ्या आयुष्यात एकही गोष्ट बरोबर केली नाही”, असे म्हणत योगराज सिंह यांनी त्यांच्या चुकांसाठी माफी मागितली. तसेच, त्यांनी केलेल्या चुका ते पुन्हा करण्याबाबत विचारही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
योगराज सिंग पुढे असेही म्हणाले, “जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या गुरूंना माझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. मी माझ्या एक्स पत्नीला आणि आताच्या पत्नीला माता, असे संबोधतो. तसेच, मी माझ्या मुलांमध्ये गुरूंना बघतो.”
योगराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच हायब्रो स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते म्हणालेले की, सध्या मी माझ्या संपूर्ण कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. मला त्यांच्यापैकी कोणाचीच आठवण येत नाही. मी आता खूप धार्मिक झालो आहे. मला माझ्या मुलांची आठवण येत नाही; पण मी त्यांचे चांगले संगोपन करू शकलो याबद्दल मी कृतज्ञ आहे.
एसएमटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणालेले, “माझे कुटुंब आणि मुलांशी त्याचे पटत नाही. याचे एक कारण म्हणजे माझ्या कुटुंबाला भीती आहे की, मी माझ्या नातवाला ओरियनला युवराजप्रमाणेच कठीण परिस्थितीचा सामना करण्यास भाग पाडेन. ज्या दिवशी युवराज त्याच्या मुलांना माझ्या स्वाधीन करेल, त्या दिवशी त्यांचेही त्याच्यासारखेच हाल होतील. तुम्ही फक्त आगीतून सोने बनवू शकता. कोणतीही दया दाखवली जाणार नाही. त्यामुळे त्यांना भीती वाटते. म्हणून आम्ही एकत्र राहत नाही.”
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये युवराज सिंगने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने याबद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणालेला की, मला भीती वाटते की, माझे वडील माझ्या मुलाला ओरियनला क्रिकेट खेळण्यास भाग पाडू शकतात आणि मला माझ्या वडिलांनी केलेल्या चुका मला परत करायच्या नाहीत.