Zubeen Garg Last Video Viral: लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांचे अचानक निधन झाले. ५२ व्या वर्षी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना विचित्र अपघात झाला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. झुबीन आज (२० सप्टेंबर रोजी) नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी सिंगापूरमध्ये होते, पण त्यापूर्वीच ही भयंकर घटना घडली. झुबीन यांचा निधनापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, झुबीन समुद्रात पोहत असताना त्यांची प्रकृती खालावली. सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी झुबीनला समुद्रातून बाहेर काढलं. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण सीपीआर देऊनही डॉक्टर त्यांना पुन्हा शुद्धीवर आणू शकले नाहीत आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
सोशल मीडियावर झुबीन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो या दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीचा आहे. व्हिडीओत झुबीन क्रूझ पार्टीचा आनंद घेत, लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारताना दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबीन समुद्रातून पुन्हा बोटीत परतले आणि लाईफ जॅकेट काढून पुन्हा पाण्यात उडी मारली होती.
पाहा व्हिडीओ-
लाईफ जॅकेट घालून पोहायला अस्वस्थ वाटत असल्याचं ते म्हणाले होते. पण लाईफ जॅकेट न घालता पाण्यात उडी घेतल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी सीपीआर देण्यात आला. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करूनही, शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास आयसीयूमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले.
झुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी समजल्यावर पत्नी गरिमा सैकिया गर्गवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये झुबीन गर्ग यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता त्यांचे पार्थिव भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले जाईल आणि नंतर मायदेशी आणले जाईल. झुबीन यांचे पार्थिव गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियममध्ये ठेवण्यात येईल. इथे कुटुंबीय आणि चाहते त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील.
झुबीन गर्ग यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, बंगाली व आसामी गाणी गायली. २००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्याने झुबीन गर्ग यांनी लोकप्रियता मिळाली होती.